0251 -2209396 / 2200921 | csmandal_kalyan@rediffmail.com

अरण्यातील प्रकाशवाटा

आजही आपल्या देशातील काही नागरीक मुलभूत गरजांपासून दुरावलेले आहेत व अज्ञान, रोगराई, दारिद्रयात मरण यातना भोगत आहेत. अर्थात आपले आदिवासी बांधव, कुष्ठरोगी ! पण ह्या अंधारातही एक पणती बाबा आमटेच्या आनंदवनाच्या रूपाने प्रकाशाची वाट उजळते आहे. तेव्हा ह्या सेवाव्रत जोपासलेल्या श्री.बाबा आमटे ह्यांच्या कर्मपुण्यभूमीस सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने व बाबा आमटे ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष ह्याचे औचित्य साधून विवेकानंद संकुल सानपाडा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १३ जण १५ ऑगस्ट २०१४ ते १९ ऑगस्ट २०१४ ह्या कालावधीत त्यांची अभ्यास सहल पार पडली १६ ऑगस्टला आनंदवनात श्री.विकास आमटे बाबा आमटेचे सुपुत्र यांच्याशी भेट झाल्यावर लक्षात आले की, आनंदवनात कुष्ठरोग्यावर उपचार झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी, उदरनिर्वाहासाठी अनेक समाजोपयोगी प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. पादत्राणे, टॉवेल, चटई रजया, धागे, तीन चाकी सायकल अशा अनेक वस्तू कुष्ठरोगी, अंध, शारीरिक अपंगत्व असलेले कुशलतेने करतात. वृध्दासाठी स्नेहसावलीसंस्था प्रेमाची सावली देते. त्यावेळी असे मनोमन आत्मपरीक्षण करावेसे वाटले की, आपल्याला हात, पाय सर्व आहे पण आपण आपल्याच स्वार्थी कोषत वावरतो. त्या कोषातून बाहेर पडून सामाजिक कार्यात कृतीशील सहभाग घ्यावा अशी दिशा व प्रेरणा मिळाली . १७ ऑगस्टला हेमलकसा ह्या ठिकाणी भेट दिली. बाबा आमटेंचे सुपुत्र श्री.प्रकाश आमटे ह्यांनी १९७३ साली लोकबिरादरी प्रकल्प सुरु केला. बाबा आमटेंचा नातू दिंगत आमटे ह्यांनी आमच्याशी सवांद साधला. ह्या संवादात असे लक्षात आले की, बाबा आमटेची तिसरी पिढीही आजोबांच्या सेवाव्रताने झपाटून, सर्व सुखाना लाथाडून पूर्ण जीवन समाजसेवेकरीता वाहून घेतले आहे. माडिया आणि गोंड ह्या अति मागास आदिवासीच्या जीवनात श्री.प्रकाश आमटे ह्यांच्या रूपाने प्रकाश उजळला. त्यांनी आदिवासींच्या मनातील भीती, अंधश्रद्धा कमी केली ,त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या पत्नीनेही त्यांनी साथ दिली . १८ ऑगस्टला सोमनाथ प्रकल्पाला भेट दिली व बाबा आमटेंचा दूरदर्शीपणा , निसर्गाचा अभ्यास पाहून थक्क झालो. सोमनाथ ह्या ठिकाणी बाबांच्या हयातीत २७ तळी बांधण्यात आली होती. टायरपासून बांधलेले भक्कम धरण पाहून तर सर्व इंजिनियर नक्कीच थक्क झाले असतील. संध्याकाळी नागपूरला श्री.हेडगेवार स्मृती कार्यालयास भेट दिली. १९ ऑगस्टला ड्रगन palace, दिक्षाभूमीला भेट दिली. चार दिवसांच्या अभ्याससहलीत फक्त ह्या ठिकाणांना भेट देणे एवढाच हेतू नव्हता तर ह्या ठिकाणांतील वास्तवरूपी अनुभव हृदयात साठवून बुद्धीरूपाने स्वत:त व आपल्या विद्यार्थी, पालकांच्या माध्यमाने समाजात उतरविणे हा आहे बाबा आमटे व त्यांच्या कुटूबांच्या निस्वार्थी मानवसेवेमुळे आदिवासी समाजातील रोग, अंधश्रद्धा कमी झालेली आहे. शिक्षणाचे महत्व पटून मुले शाळेत येऊ लागलेली आहे. तेंव्हा आपणही प्रत्येकाने ह्या समाजकार्यात हातभार लावला तर हे कार्य अधिक सहजतेने पार पडेल व अरण्यातील प्रकाशवाटा तेजोमय होतील.

– सौ.ऋतुजा रविंद्र गवस, विवेकानंद संकुल सानपाडा, नवी मुंबई.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top