इंदिरा संत म्हणजे ज्यांचं काव्य नव्या व जुन्या दोन्ही मतांच्या रसिकांनी वाखाणल अशा एकमेव कवयित्री होय. मर्ढेकरी युगात विशुद्ध कलाविष्कारचे अत्यंत संपन्न रूप म्हणजेच इंदिरा संतांच्या कविता होत. मराठी कवितेच्या परंपरेत इंदिरा संतांच्या कवितेला एक स्वतंत्र आणि प्रतिष्ठेचे स्थान आहे. रसिक वाचकाला आणि जाणकार समीक्षकाला समांतरपणे आवडणारी व मोहवणारी कविता आहे. प्रेम आणि एकटेपणाचे दुःख या अनुभवांनी भारावलेली संवेदना, अत्यंत तरल, उत्कट निसर्ग जाणीव या विशेषणांमुळे इंदिराबाईंची कवी प्रकृती रोमॅटिक प्रवृतीशी जुळणारी आहे.
इंदिरा संताच्या कविता समजून घेताना त्यांच्या कवितेतील प्रतिमा मनावर ठसत जातात. या प्रतिमा कवयित्रीच्या जाणिवांतून स्फुरलेल्या तिच्या भाववृतीत विरघळलेल्या तिच्या अनुभवाशी नातं सांगणाऱ्या वाटतात. ” झंझावात ” ( शेला पृष्ठ क्र.२४-२५) आणि “ऐक जरा ना ” (मृगजळ ) या दोन कवितांची तुलना केल्यास प्रतिमांच्या वापरामुळे इंदिराबाईंच्या कवितेला एक वेगळे सामर्थ्य मिळाले आहे. दोन्ही कवितेतील वातावरण एकच – पावसाळी आणि पूर्वस्मृतिनी वादळी बनले आहे. पण झंझावातामध्ये वर्तमानकाळातील एकटेपण आणि भूतकाळातील सहजीवन तसेच घराबाहेरचा झंझावात आणि मनातला उत्पात एकापाठोपाठ वर्णन येते.
शेलामधील प्रतिमा निवेदनात्मक व वर्णनपर घटकांना भाववृत्ती सन्मुख करण्याचे काम करतात.तर मेंदिमधील प्रतिमा झपाटलेल्या भाववृतीशी संवेदानाजन्य प्रतीती करून देण्याचे कार्य करतात. तर मृगजळातील प्रतिमा अर्थ सधनतेवर भर देण्याचे व आशय मनावर ठसविण्याचे काम करतात. त्यांच्या प्रतीमासृष्टींचा विशेष म्हणजे त्या प्रामुख्याने विविध निसर्ग रूपाने घडलेली आहे. याचे कारण म्हणजे खुद्द इंदिराबाईनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या भावजीवनात निसर्गाला अनन्यसाधारण महत्व आहे.( शेला- प्रस्तावना)
इंदिरा संताच्या प्रतिमा विश्व व प्रतीमाशक्ती पुढे अधिक गहिरे, सूक्ष्म होत गेले. उदा:’ वाघूळ’, ‘मृण्मयी’,’बाधा’, ‘येतील दोनच हिरवी पाती’, मघाशीचकी’, नुकती विरली’,’ मरवा'( इत्यादी मेंदितील कविता )’ बाकी’, ऐक जरा ना’, मृगजळ’, उद्याच्या बनात’, ‘काहूर’, सावध’. ( इत्यादी मृगजळातील कविता) या सारख्या कवितांमधून ” तो” नसण्याचा त्याच्या दुरावण्यातून आलेला एकटेपणा, दुःखाचा अनुभव या कवयित्रीने वेगवेगळ्या प्रतिमांतून मांडला आहे.
इंदिरा संताच्या कविता सलग वाचताना ‘ अंधार’, ‘पाउस’, ‘ वीज’, ‘पाखरू’, ‘चांदणे’, ‘चंद्र’, ‘रात्र’ यासारख्या पुन्हा पुन्हा भेटतात.कवीमनाची विविध भावस्थिती साकार करण्यासाठी वेगवेगळी पाखरे इंदिराबाईंच्या कवितेत आलेली दिसतात. उदा: ” माझ्या मनीच्या गोड सारिका” ( शेला पृष्ठ क्र.७४ )” करकरत्या तिन्ही सांजेला कोठारात मूक झालेली पाखरे आणि अशुभाच्या चाहुलीले पिंजऱ्यात फडफडणाऱ्या हृदयाचा रावा ( शेला पृष्ठ क्र.६९) संध्याकाळच्या कातरवेळी तळ्यावर भिरक्या घेणारा चुकला पक्षी ( मेंदी- नुकती विरली) मावळतीला अगदी मोकळे सोडलेले आणि मग पंख गोळा न करता अवचित निसटून जाणारे मनपाखरु ही सर्व कवयित्रीच्या कातर उदास मनस्थितीची प्रतिरूपे बनली आहेत. ” चंद्रसूर्य चांदण्याचे वाळवण टिपण्यासाठी प्राण पाखडणारे पाखरू ” म्हणजे अद्भुत रम्य अनुभवांसाठी आसुसलेले कविमनच असते.( गर्भरेशीम पृष्ठ क्र. ३०) या विवध कवितांत वापरलेली पाखरांची प्रतिमा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थ सुचवताना दिसते.
इदिरासंताचे बहुतेक सर्व काव्य प्रतिमांच्या रूपातच शब्दरूप घेते. केवळ वर्णन मग ते कितीही रत्नजडीत असो काव्याच्या दृष्टीने गौणच ठरते. प्रिय पतीच्या अकाली निधनाने इंदिराबाईच्या जीवनाला ‘ उधवास्ताची’ कळा आल. त्यांचे जीवन चीरविरह प्रेमातच गुंतून पडले. हे सर्व विरह वेदनेचे माहाकाव्य त्यातील विविधरंगी प्रतीमानिर्मितीतूनच अमर झाले आहे. मराठी काव्य सृष्टीतील हे एक अपूर्व रत्नजडीत सप्तरंगी इंद्रधनू आहे.त्या स्वतः म्हणतात….
“रंग रंग हे जमती भिनती
मीच होतसे इंद्रधनू अन
तुझ्या जीवाच्या आकाशावर
अशी सुरंगा राहते रेखून
आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवी पदरात काजवे”
या चरणातून प्रतिमांचे अंतरंग सहज उलगडून दाखवता येईल. प्रेयेसीचे (मीच) इंद्रधनू होते. प्रेयेसी आणि इंद्रधनू या दोन भिन्न वस्तू ( उपमान- उपमेय) राहिलेल्या नाहीत हीच अभेद प्रतीती पुढील दोन चरणात अधिक स्पष्ट होते. जग सोडून गेलेल्या प्रियकराला टी म्हणते- ” तुझिया लाख प्रीतीचे काजवे………. येथे स्मृतीच काजवे झाली आहे . यातून प्रतिमा निर्माण होते. हि कल्पना थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडली कि रूढ पद्धतीचा अलंकार तयार होतो.काळोखात चमकणाऱ्या काजव्याप्रमाणे चकाकणाऱ्या तुझ्या स्मुर्ती रूढ अलंकार आणि प्रतिमा यातील भेद तयार होतो.
प्राजक्ताच्या प्रतिमेतून कवयित्री आपल्या मनातील कडू जहरी वेदनांचे वण व्यक्त करीत आहेत. मित्र मैत्रिणींच्या बैठकीत विविध सुखदुःखाच्या, गौरवाच्या, त्यागाच्या गुजगोष्टी प्राजक्ताची फुले ढाळावीत तशा बरसतात. बैठक संपताच मोकळा झालेला प्राजक्त उरलेल्या मनगोष्टीच्या जाणीवेत स्थब्ध उभा राहतो.शेवटी कवयित्री म्हणते,” असा बहर ढळून गेला कि, त्याचे कडू जहर रस फांद्याफांद्यातून जाणवतात.आणि प्राजक्त अगदी स्तब्ध होवून जातो.
इंदिराबाईंच्या कवितेतील काही ठळक महत्वाच्या प्रतिमा पुढीलप्रमाणे
* माती
पाझरणारी घागर घेवून निथळणारी गौळण ( शेला- पृष्ठ क्र.२४) धानिनीचे गुपित कळल्यावर दिडक्या पावलांचे स्वप्न पाहणारी हिरवी सारवलेली जमीन ( बाहुल्या पृष्ठ-क्र.८१ ) बालपणी चांदणी झालेली रेतीमाती ( रंगबावरी पृष्ठ क्र.२८) पाउल दचकणारी गुहेतली धुळीची भुई ( शेला पृष्ठ क्र.७१) झिमझिम चांदण्यातली मंतरलेली गूढ भुई ( मेंदी पृष्ठ क्र. ४३) अशी मातीची अनेक रंगरूपे या कवितेत आढळतात. कधी ती माती निसर्गातील प्रतिनिधी बनून ओळख नाकारते.( मृगजळ पृष्ठ क्र.१०) जहर होऊन डंख मारते( रंगबावरी पृष्ठ क्र. ४३ ) तर कधी कावायीत्रीसारखी दुसरी बनते.( रंगबावरी पृष्ठ क्र.४२ )
इंदिराबाईंच्या काव्यात्म व्यक्तित्वाला ‘माती’ विषयी खास उत्कट आत्मीयता असावी म्हणूनच त्या स्वतःविषयी म्हणतात
” रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन”
या ओळींमुळे इंदिराबाईंच्या कवितेतील माती प्रतिमेला एक विशेष अर्थ वलय लाभते.माती हे ऐहीकतेचे, जीवनासाक्तीचे, जीवाच्या निरनिराळ्या बंधनाचे, मर्यादांचे रूप आहे. तसेच निसर्गाच्या सनातन सृजनशीलतेचेही प्रतिक आहे. एकाचवेळी इंदिराबाईंनी ” माती” च्या प्रतिमेत मानवी जीवनाचे अधुरेपण आणि निसर्गाचे चैतन्य दोन्हीही सामावून घेतलेली दिसतात. स्वतः चे हे मृण्मयी अस्तित्व कवयित्रीने मनस्वीपणे स्वीकारलेले दिसते.
* वाट
रुक्ष विरागी चिरप्रवासी सडक( शेला पृष्ठ क्र.३८) कालचक्राच्या अव्याहत गतीचे भान देणारा घड्याळाचा डांबरी रस्ता ( मृगजळ पृष्ठ क्र.८६) जीवनाच्या वाटचालीत शिणलेला पायांना भुते फुटल्यावर भिऊन पळणारी वाट ( रंगबावरी पृष्ठ क्र.६०) आयुष्याच्या उतारावार थोडी पावले उरलेली असतानाची डोळ्यात न मावणारी विमुक्त लावण्य दाखविणारी वाट ( गर्भरेशीम पृष्ठ क्र.१३२) ही वाटेची रूपे कविमनाला घेवून जाणारी आहेत.
* आकाश
प्रेम भावनेतील विविध ताण साकार करताना अभाळाचेही रंगरूप पालटत असते. प्रियकराच्या व्य्क्तीमात्वातले रंग भिनवून घेवून इंद्रधनू झालेली ” ती ” “त्याच्या ” जीवनाच्या आकाशावर रेलून राहते.( मेंदी पृष्ठ क्र. ३२) मनाचे आभाळ उजाडते तेंव्हा चंद्र चांदण्याचा ओघळ दूरवर पोहचतो.( मेंदी पृष्ठ क्र. ४७) प्रेम जीवनाचे उध्वस्त होणे सांगण्यासाठी आलेली कलंडलेल्या आभाळाची प्रतिमा इंदिराबाईंच्याच नव्हे तर मराठी भाव कवितेतही अपूर्व आहे.
स्वतःचे बालपण ओलांडून मन अनुभवीत असणारा, निसर्गात भरून राहिलेला विमुक्तपणा व्यक्त करण्यासाठी आकाशाच्या बांधलेल्या झोक्याची प्रतिमा येते.
” आता आजपासुनीया
माझे आभाळाचे मन”
( रंगबावरी पृष्ठ क्र. १०३)
अशा शब्दात व्यक्त होते. काही ठिकाणी अधिक सूचक, संमिश्र अर्थच्छटा या प्रतिमेला लाभतात.पदराचे आभाळ सावरताना जुईची पुनव होणे ( गर्भरेशीम पृष्ठ क्र. २२ ) आभाळाच्या जंजाळात गुंतलेल्या तिच्या पदराच्या रेशीम दशा ( गर्भरेशीम पृष्ठ क्र.५६ ) येथे कवयित्रीची निसर्गातली वैयक्तिक , भावनिक गुंतवणूक व्यक्त कारतानाचा पदर- पदर सावरणे इत्यादी संस्कुतिक संकेत, संदर्भ जोडले जाऊन आभाळाची प्रतिमा व्यामिश्र बनते.
* क्षितीज
इंदिराबाईंच्या कवितेत क्षिताजाच्या प्रतिमेमध्ये आमर्याद्पणा आणि बंधने, मर्यादा या दोन्हींची सांगड योग्य पद्धतीने घातलेली दिसते.उदा: ” क्षितिजाचे काजळ घातले की दिशांदिशांची जाणीव सुटते. ( मेंदी पृष्ठ क्र. ५० )
” बोलावा तो शब्द काही
क्षितिजाचे व्हावे ओठ “
( मृगजळ पृष्ठ ७३ )
म्हणून मी क्षितिजापाशी / सारे तोडोनिया बंध
( रंगबावरी पृष्ठ १०४ )
अशा ओळीतून एकीकडे अफाट आकाशाची मर्यादा या अर्थाने क्षितीजाचा उल्लेख येतो. आणि दुसरीकडे कवयित्रीचा कठोर संयम म्हणून तर कधी व्यक्तिमत्वाच्या वैयक्तिक सुख दुःखाच्या मर्यादा ओलांडण्याची आस या वेगवेगळ्या अर्थाने क्षितिजाची प्रतिमा योजलेली दिसते.
* चंद्रचांदणे
चंद्र चांदण्याचे एकूणच मराठी काव्य परंपरेत प्रेम भावनेशी असणारे साहचर्य न नाकारताही इंदिराबाईंनी या प्रतिमांचा स्वतंत्र वेगवेगळ्या दृष्टीकोनातून वापर केल्याचे जाणवते. उदा: ‘उत्फुल्ल पीत हे ‘ या कवितेते हासरे चंद्रबिंब, त्याचे रुपेरी चांदणे, प्रथम प्रीतीच्या आठवणी जागृत करणारे पण कवितेच्या शेवटी विरहाचे कारण बनून कापराप्रमाणे पेट घेवून जिने असत्य करते. तेंव्हा एक वेगळाच प्रत्यय जिवंत होतो/ विरहार्त, एकाकीपणाचा अनुभव, दुःख यामुळे इंदिराबाईंच्या कवितेतल्या चांदण्यामध्ये विखार भरताना दिसतो. उदा: बाधा ( मेंदी पृष्ठ क्र ४३ )’ उभे मात्र थेंब रक्त’ ( मृगजळ पृष्ठ क्र ४३ )
चंद्राचा गळ लावून काहीतरी शोधणारी रात्र, बैचेन हुरहुरलेल्या कविमनाचे प्रतिरूप बनते.( रंगबावरी पृष्ठ क्र.३८) चंद्रकोर सारख्या कवितेत पौर्णिमेचा पूर्ण चंद्र सफल प्रेमजीवनाची तर चंद्रकोर अधुऱ्या प्रेमाची , विरह व्याकुळ मनाची प्रतिमा बनते. या प्रतीमांतील विरोध पौर्णिमेचे चांदणे आणि चंद्रकोरीचे फिके, क्षीण तेज यातून अधोरीखीत होते.
चांदोबाची वाळी, पाण्यातले चांदण्याचे चाळ ( शेला पृष्ठ क्र. १४) किंवा तेला हळदीचे पिवळे, कोवळे सतेज बालक असा तान्ह्या सूर्याच्या न्हालेल्या पाण्याचा मुलामा घेवून अंबरी येणारा ” पिवळा चंद्रमा” ( शेला पृष्ठ क्र.५५) साकार करताना इंदिराबाई वात्सल्य भावनेची सह्च्र्ये चंद्राच्या प्रतिमेशी जोडून तिला नवेपण देतात.
कधी मनातले गुज लिहिल्यावर त्यावर शिंपायला चांदण्याची वाळू कवयित्रीला हवीशी होते.(मेंदी पृष्ठ १५) तर कधी आभाळाच्या पाटीवर प्रेम जीवनाचा हिशोब मांडताना चंद्रच हातचा घ्यावा लागतो. आणि तरीही मेळ जमत नाही बाकी उरते ( मृगजळ पृष्ठ क्र.१५) कवयित्रीच्या डोळ्यातून ओघळलेला अश्रूंचा थेंबच कधी चंद्र बनून जातो.
अशा रीर्तीने चंद्राच्या चांदण्याच्या प्रतिमेला कवयित्रीने आसांकेतिक आकार, रंग अर्थ दिलेलं दिसतात.
* काळोख
कवयित्रीच्या मनातील विरहाची भावना. दुःख विव्हल भावना साकार करण्यासाठी काळोखाची प्रतिमा पुन्हा पुन्हा येते. कातरवेळचा अंतर गारठवून टाकणार थंडगार अंधार ( शेला पृष्ठ क्र.२१) तिन्ही सांजेचा धुरकट, अशुभ अंधार ( शेला पृष्ठ क्र.६९) एकटेपणी त्याच्या विचारात रंगताना त्याच्या मनाला ओढाळ मस्ती आणणारा कोवळा अंधार ( मृगजळ पृष्ठ क्र.७७ ) बेसावधपणे घरावर कडे घालणारा अंधार ( मृगजळ पृष्ठ क्र ५ ) घड्याळाच्या डांबरी रस्त्यावरून सारखा फिरणारा काळोखाचा घोडा ( पृष्ठ् क्र. ८६) एखाद्या प्राचीन गुहेतला जुनाट, बाधिक दर्प असलेला गार अंधार ( शेला पृष्ठ क्र. ७१ ) काळोखाचे अनेक सागर ( रंगबावरी पृष्ठ क्र. ८८)
काळोख, रात्र या प्रतीकांच्या माध्यमातून अनेक सूक्ष्म भाव्च्तांचा मागोवा घेणारी इंदिराबाईची ‘ अनंत काळोखातील वाटचाल’ ( गर्भरेशीम’ पृष्ठ क्र.८६) त्यांच्या कवितेतून साकार होते. या कवयित्रीच्या सृजनशील मनाने या अंधारयात्रेमध्ये’ गती, रात्र, स्पर्श,गंध,अशा विविध संवेदनांनी हा अंधार अनुभवला म्हणूनच तो केवळ एक रंगी राहिला नाही. ” डोळा दाटला अंधार, झाला चांदणा- चांदणा ” असा काव्यात्म सौंदर्याने नटून गेला म्हणून काळोखाच्या प्रतिमांनी इंदिरा बाईंच्या कवितेला सतत नवे बळ, नवे सामर्थ्य दिले.
* नागीण
इतर प्रतिमांच्या तुलनेने नागिणीची प्रतिमा इंदिरा बाईंनी अधिक संधीग्धपणे वापरलेली दिसते.वृक्षाच्या गूढ सावलीत निद्रिस्त मंत्रमुग्धशी नागीण ( मेंदी पृष्ठ क्र. ८३) “त्यांच्याकडे निघाले असताना पायाखाली वळवळणारी पिवळी नागीण, स्मृतीलाच कधी पाच फड्याची नागीण म्हटले आहे (मृगजळ पृष्ठ क्र.७१) कधी पावसाची रात्रच छतातून डंखा सारखी उतरते.’ नागीण’ बनून कवयित्रीला विष पाज्वते. ( मृगजळ पृष्ठ ८२ )
या साऱ्या प्रतिमांतून नागिणीचा वळसेदार गतीचा वापर केलेला दिसतो. ‘ कात’ या कवितेत स्वतःचीच दोन रूपे – प्रत्यक्ष व्यवहारातील निःसत्व जिणे आणि मनस्वी स्वप्नाळूपणा यातील विरोध सोलीव कात आणि अदृश्य झालेली नागीण या प्रतिमांतून व्यक्त होते.
* उंबरठा
व्यावहारिक जीवनाच्या मर्यादा, बंधने, मानवी जीवन आणि निसर्गाशी बंधमुक्त, सुंदर, निरभ्र,तरल,विश्व यांना विभागणारी रेषा म्हणजे उंबरठा. जीवन आणि जीवनापार गेलेलं पण कवयित्रीच्या मनात सातत्याने जागृत असणारे प्रियकराचे अस्तित्व यांच्यातील विरोध स्वतःच्या ऐहिक मर्यादांचे, दुब्लेपानाचे,विकलतेचे प्रतिरूप अनेक सूक्ष्म, विरोधात्म ताणांनी उंबरठ्याची प्रतिमा इंदिराबाईनी आपल्या कवितेत सजीव केली आहे.
समोर उरते (मृगजळ पृष्ठ ७५) उंबरठ्याशी ( मृगजळ पृष्ठ २१) या कवितांत उंबरठ्याची प्रतिमा अधिक समर्थपणे वापरलेली आहे. ‘ उंबरठ्याशी मध्ये उंबरठा हा कवयित्रीच्या लेखी एक अनुलंघ्य रेषा आणि तिच्या अथांग सोशिकतेची प्रतिमा बनतो.
उंबरठ्याच्या प्रतिमांच्या संदर्भात आणखी एक निरीक्षण नोंदवता येते ते असे कि, ‘बाहुल्या ‘,’ गर्भरेशीम’, या अलीकडच्या संग्रहामध्ये तिचे अस्तित्व जाणवत नाही. इंदिराबाईच्या भावविश्वातला अंतर्विरोध, ताण, संघर्ष संपल्यावर या प्रतिमेचे प्रयोजन उरले नसावे.
इंदिराबाईंच्या प्रतिमा विश्वाचे स्वरूप समजून घेताना त्याच विश्लेषण प्रतिमांच्या गुणवैशिष्ट्ये नुसारही करता येते. काही प्रतिमा स्थिती सूचक, स्थिरत्वाचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.उदाहरणार्थ- ‘ कलावंतीणीचा वेल ‘ ( शेला ‘ पाखराच्या पिसापरी ( शेला पृष्ठ क्र ५७) स्थिरचित्र ( रंगबावरी ऊश्रःट८१) तर काही वेळा हालचालीचे निसर्ग घटकात अंतर्भूत असणाऱ्या गतीचे परिमाण लाभल्यामुळे गतीसुचक बनतात. उदा. ( शेला पृष्ठ क्र.१ ) झंझावात ( शेला पृष्ठ क्र २४ उत्फुल्ल पीत हे ( शेला पृष्ठ क्र २६) गजांतूनी मी ( शेला पृष्ठ के ५०) वाघूळ ( मेंदी पृष्ठ क्र७) उभी तुळस वेल्हाळ ( मेंदी पृष्ठ क्र ५७) येतील दोनच हिरवी पाती ( मेंदी पृष्ठ क्र ५०) ऐक जरा ना ( मृगजळ पृष्ठ क्र५) स्वप्न तुझे ( मृगजळ पृष्ठ क्र ६३)
या प्रतिमांचा संकलित विचार केला तर असे जाणवते की, सुरुवातीच्या काळात एखादे संवेदानांग , एखादी भावना याचा प्रत्याय देणाऱ्या आणि म्हणूनच एकेरी, साध्या वाटणाऱ्या प्रतिमा इंदिराबाईनी योजल्या. इंदिराबाईंचे प्रतीमानिर्मितीचे सामर्थ्य मेंदी , मृगजळ, रंगबावरी या कविता संग्रहामध्ये टप्प्याटप्याने विकसित होत गेलेले दिसते. मेंदी या संग्रहातील ” उभी तुळस वेल्हाळ”, ” जाता जाता अवचित.” ” मुळी न कसे डचमळते पाणी”, ” कळशी” या कवितांतील प्रतिमा इंदिराबाईंची खास प्रतीमाशैली आहे ‘ कलंडणारे आभाळ,’ ‘मनातली आज्जीबाई’ ‘ न किणकिणणारे काकण’ ‘ न डचमळणारे पानी या प्रतिमा जितक्या अनोख्या तितक्याच प्रसरणशील सतत विस्तारत राहणाऱ्या आहेत.
मृगजळ मध्ये प्रतिमांचा सर्वात अधिक वापर कवयित्रीने केला आहे.’ दुःख’, ‘ तू’, ‘ पावसाची रात्र’, ‘ उभे मात्र थेंब रक्त’, ‘ काचकवड्या ‘, ‘ प्रश्न झाला’, ‘ किती लुटावे’, ‘ रेशीमकण ‘ अशा कितीतरी कवितांतून खऱ्या अर्थाने अत्यंत समर्थपणे वापरलेल्या प्रतिमा दिसतात. या संग्रहाची भाषाच प्रतिमांची भाषा झालेली दिसते. प्रतिमांचा वापर, सौंदर्य सामर्थ्य या संदर्भात विचार केला तर ‘ मृगजळ’ हा जणू इंदिराबाईंच्या प्रतीमानिर्मितीचा उत्कर्ष बिंदू ठरतो.
इंदिराबाईंच्या प्रतिमा विश्वाची काही वैशिष्ट्ये
* निसर्गसृष्टीतून वेचलेल्या प्रतिमांमुळे एक सलगता आणि सार्वत्रिकता लाभलेली आहे. उदा: माती, वाट, रस्ता, आशा या प्रतिमा एकमेकातून उत्क्रांत झालेल्या वाटतात इंदिराबाईंच्या कवितेत आकाशाची प्रतिमा चंद्र चांदणे यांना सामावून घेणारी वाटते.पावलाखालची धरणी आणि माथ्यावरचे आभाळ हि दोन टोके असली तरी परस्परांचे अस्तित्व अपरिहार्य जाणवून देतात. शिवाय क्षितिजाची प्रतिमा स्वतंत्रपणे वापरलेली असली तरी ती आभाळ व माती यांना जोडणारा दुवा म्हणूनही येते.
* इंदिराबाईंच्या प्रतिमा कधीही विकेंद्रित , विस्कळीत आणि दुर्बोध वाटत नाहीत. प्रतिमा हा काव्याचाच एक घटक आहे. त्यामुळे कवितेच्या भाव आशयाशी असणारे अतूट नाते हा कवितेतील प्रतिमांचा मुलभूत निकष आहे.
* कवयित्रीची प्रतिमासृष्टी निसर्गावर उभारलेली असल्यामुळे प्रथमदर्शनीच ती प्रतीमारूपे वाचकाला परिचित, जवळची वाटतात.निसर्ग प्रतिमांमुळे कवितेच्या सोपेपणाविषयी त्याच्या मनात विश्वास निर्माण होतो.
कवितेतील प्रतिमा अनुभवाला आकार आणि चैत्यन्य, भाववृतीचे स्पंदन देतात. अनुभवांच्या वेगवेगळ्या पैलूंचे- छटांचे दर्शन घडविताना अनुभवाला प्रत्ययक्षम बनवितात.अमूर्ताला साकार जिवंत करणे, इंद्रीयाकरवी अतींद्रिय भोगणे हे प्रतिमेमुळे शक्य होते.या सामर्थ्यामुळे प्रतिमा अनुभवाला साररूप देत असली, अर्कभूत बनवीत असली तरी ती प्रतीकाप्रमाणे एकाच विशिष्ट अर्थाशी बांधलेली नसते. प्रतिमेत जाणवणारी संदिग्धताच कवितेला सुचकतेचे बळ पुरवीत असते.
इंदिराबाई स्वतःच्या प्रतिमासृष्टीबद्दल म्हणतात,” एखादी भाव जाणीव शब्दरूप धरीत असता ज्या प्रतिमा मी वेचल्या त्यांचे नाविन्य , त्यांची विविधता आणि त्यांचा भाव शोधून घेण्याची शक्ती हि माझ्या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्ये म्हणून सांगता येईल.”
इंदिराबाईंचे बहुतेक काव्य प्रतिमांच्या रुपात व्यक्त होते. त्यांच्या प्रतिमा मर्यादित विश्वातून फुले,पक्षे,चांदणे, वीज, काजवा अशा मर्यादित वस्तुतुनच त्यांच्या प्रतिमा फुलतात. ” निखाऱ्यावर पडणारा जलबिंदू तडफडतो” या प्रतिमेने तडफडणाऱ्या दुःखाचे साक्षात दर्शन त्या वाचकाला घडवितात. ” मनाच्या नसा काळपडणारा कडवट काळा प्रकाश : स्तब्ध स्वयंभू पहाडापरी पुढ्यातच उभे दुःख, रक्त माखला शब्द, लाल तांबडी वेदना, संगमरवरी बधिरता, काळी बेहोशी,नाहीस ” तू” चा प्रचंड पुतळा, रक्त माखल्या शब्दांचा घुमणारा लाल आवाज,तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे, काळोखाच्या चीऱ्याचेही जाते हलून काळीज,लाख वेदना गिळून टाकल्यावर त्या लाखांच्या अंगावर उफाडणाऱ्या निवडुंगाच्या उग्रशा फडा फुटतात. अशा कितीतरी आशयाचे भीषण स्वरूप चित्रित करणाऱ्या प्रतिमा मराठी काव्य सृष्टीत नव्याने आलेल्या आढळतात.
अशा प्रकारे पार्थिव चीत्र्नातील सारी पार्थिवता आबाधित ठेवून पुन्हा त्या अविष्काराला अपार्थिव सौंदर्य प्राप्त करून देण्याची किमया इंदिराबाईंच्या अनेक कवितांतील प्रतिमांतून आढळते.
आपल्या प्रवासाच्या ऐन अर्ध्या टप्प्यावर इंदिराबाई असतानाच विंदा करंदीकरासारख्या त्या कालखंडातील एका समर्थ आणि प्रतिभाशाली कवीच्या जोडीने त्यांच्या नावाचा निर्देश करून “मर्ढेकर संपला, आता मर्ढेकरी युग आहे.” अशा शब्दात स्वतः मर्ढेकरांनी केलेल्या त्यांच्या प्रतिमेच्या गौरवाची, पुन्हा पुन्हा आठवण आल्याखेरीज राहत नाही
विलास वाव्हळ
मुख्याध्यापक
विद्यामंदिर मांडा- टिटवाळा
ता. कल्याण, जि, ठाणे