यज्ञेश बाबर इयत्ता दुसरी
शनिवार दि. २८/१०/२०२३: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनास ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या सदर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या नवीन धोरणाच्या कार्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीची मुहूर्तमेढ रोवली.
“शिवतेज २०२३” या सुंदर नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संस्थेतील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. सर्व शाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत विविध कार्यक्रम नृत्य,नाट्य,गायन या स्वरुपात सादर करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण वंदे मातरम् या राष्ट्रगीताने करण्यात आली तद्नंतर श्री.अण्णा जाधव यांचे सुमधुर बासरीवादनाने आसमंत मंत्रमुग्ध झाला .
या कार्यक्रमात काही शाळांना आदर्श शाळा संकुल पुरस्काराने गौरविण्यात आले. मा. श्री मंगलप्रभात लोढा (पर्यटन मंत्रालय,कौशल्य विकास आणि उद्योजकता – महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात विवेकानंद संकुल- सानपाडा, नूतन ज्ञानमंदिर हायस्कूल-तीसगाव, विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळांची निवड करण्यात आली. तसेच विशेष उपक्रमशील शाळा म्हणून अभिनव विद्यामंदिर, पारनाका-कल्याण या शाळेला गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे शिवतेज २०२३ या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून नूतन विद्यालय – कर्णिक रोड कल्याण या शाळेने सादर केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा या कलाकृतीला प्रथम क्रमांक तर नूतन ज्ञान मंदिर हायस्कूल- तिसगाव कल्याण या शाळेच्या श्री.शिवसूर्य हृदयस्थ या कार्यक्रमास द्वितीय तसेच अभिनव विद्यामंदिर, पारनाका,कल्याण शाळेने सादर केलेल्या पोवाडा गायनास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत संस्थेतील शाळांमधील शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या आनंददायी अध्यापन चित्रफित स्पर्धेत यात संस्थेतील १८० उपक्रमशील शिक्षकांनी सहभाग घेतला. त्यात माध्यमिक विभागातून भाषा विषयासाठी श्री. संजय विष्णू जाधव, सौ.हेमलता सुरेश जामकर , विज्ञान व गणित विषयासाठी सौ.मंदाकिनी अशोक पांगारकर, सौ.मनीषा भगवान धनवडे, कला-कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयासाठी सौ. सारिका संतोष मिसाळ, सौ.शीतल सुहास जाधव यांची उत्कृष्ट चित्रफितीसाठी निवड करण्यात आली. प्राथमिक विभागातून सौ.प्रीती तावडे व सौ.मोहिनी वाघ यांची तर पूर्व प्राथमिक विभागातून सौ.प्रिया जयगडकर, सौ.मंगला वणी यांची निवड करण्यात आली. तसेच संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी श्री.पावसे कोळसेवाडी,
सौ.नगरकर अभिनव शाळा यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रसंगी कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.श्री.विठ्ठलजी कांबळे तसेच छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. नंदकिशोरजी जोशी, उपाध्यक्ष मा. श्री ना.के फडके सर, उपकार्याध्यक्ष मा.श्री. विश्वासजी सोनवणे, सरचिटणीस मा.श्री.डॉ.निलेशजी रेवगडे सर, आणि संस्थेचे पदाधिकारी, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.सुनील पवार तसेच सर्व शाळांचे माननीय मुख्याध्यापक उपस्थित होते. या भव्य कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सरचिटणीस मा.श्री.डॉ.निलेशजी रेवगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ.अर्पिता कानेटकर, सौ.मिताली बोकील, सौ.संगीता आंबेरकर, सौ.उर्मिला जाधव, सौ.सायली कुलकर्णी यांनी केले.
असा हा सर्वांग सुंदर आणि भव्य कार्यक्रम आनंदाने आणि कलात्मकतेने फुललेल्या व शिवतेजाने भारलेल्या वातावरणात राज्यगीत गायनाने संपन्न झाला.
एकंदरीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणानुसार कौशल्यधिष्टित व गुणवत्ता पूर्ण सकारात्मक बदल करण्याचा संकल्प संसार संकल्प संस्थेने व शिक्षकांनी केला व त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची पहिली पायरी म्हणून शिवतेज कार्यक्रम मार्गदर्शक ठरला.