0251 -2209396 / 2200921 | csmandal_kalyan@rediffmail.com

बालकवींचा ” औदुंबर”

 ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटा बेटातून

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची वाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे

झाकाळुनी जळ गोड काळिमा पसर लाटांवरी

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

बालकवींची अवघी आठ ओळींची ही कविता.त्यांच्या अनेक कवितांपैकी ही कविता विशेषत्वाने गाजली. मराठी रसिकांना व टिकाकारांनाही या कवितेने वेड लावले. वेड लावण्याचे सामर्थ्य या कवितेमध्ये आहेच. अनेकांनी या कवितेचा आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.

औदुंबर ही कविता एक संजीव आहे. या कवितेची सजीवता पर्यावरणीय प्रक्रियेतून रुपास आलेली निर्मिती आहे.बालकवींनी निळ्यासावळ्या झऱ्याची आंदोलने आणि गतिमानता शब्दांनी केवळ शब्दांकितच नव्हे तर नादांकितही केली आहे.

आधीच्या सहा ओळीत सुखाकडून दुःखाकडे ,  किंवा आशेतून निराशा याचे सुंदर विरोधी चित्रण केले आहे. त्यानंतर एक चित्तवृत्ती शेवटच्या दोन ओळीत औदुंबराच्या द्वारे व्यक्त केली आहे. ही वृत्ती खिन्न परंतु संन्यस्त मनाने जगाकडे पाहण्याची स्थितप्रज्ञ वृत्ती आहे. काळ्या डोहावर औदुंबर  स्वतः आपली सावली पसरून बसला आहे तोही पाण्यात पाय सोडून निर्विकार शून्य मनाने बसला आहे. निराशेच्या मनाची द्विधा अवस्था चित्रित केली आहे.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतून

या ओळींनी कवितेची सुरुवात होते आणि अनेक दृश्य डोळ्यासमोरून सरकत जातात. झऱ्याचा हिरवागार काठ, मधूनच अल्लडपणे वाहत जाणारा निळासावळा झरा, जवळच्या टेकडीपालिकडे एक गाव, तेही चार घरांचे, कोणताही गोंधळ गडबड नाही, सळसळणारी हिरवीगार शेते, त्यांची गर्दी, या हिरव्यागार शेतांमधून पुढे जाणारी वाट, थेट डोहाकडे जाणारी पायवाट. आणि त्या डोहातील लाटांकडे पाहत बसलेला औदुंबर.

बालकवींना रंगाचे विलक्षण वेड. निसर्गाचा संवेदनशील अनुभव देणे हे बालकवींच्या निसर्ग कवितेचे वैशिष्ट्य. हिरवा रंग हा चैतन्याचा, प्रसन्नतेचा उत्साहाचा व यौवनाच वरदान घेऊन आलेला आहे. निळासावळा रंगही असाच प्रसन्नतेचा प्रत्यय देणारा . वेळ संध्याकाळची असावी. त्यामुळे डोहातील पाणी निळेसावळे आणि काळसर वाटते. काळा रंग हा विषन्नतेचा द्योतक पण येथे तसा अर्थ घेण्याचे कारण नाही.

या छोट्याशा कवितेत बालकवींनी निसर्गाचे चित्रण केले आहे.जळात पाय टाकून बसलेला हा औदुंबर कोणाला एखाद्या मुलाप्रमाणे वाटेल, कोणाला समाधीत मग्न असलेल्या स्थितप्रज्ञासारखा वाटेल तर कोणाला प्रसन्न संध्याकाळच्या वेळी कोणाची तरी वाट पाहणारा प्रियकर वाटतो. औदुंबराच्या मागे बालकवींनी असला हे विशेषण वापरले आहे. यातील अर्थछटा ध्यानात घेतली की प्रेमीकाचा भाव किंवा बालकाचा लबाड भाव प्रकट करणारा आहे.

बालकवींनी झऱ्याची गती शब्दांकित केली आहे. बेटांबेटांतून या शब्दातून झऱ्याची गतिमानता  थेट पुढे जाण्याची गती सूचित केली आहे. शेतमळ्यांची हिरवी गर्दी दाट या नेमक्या शब्दाने जाणवते. या कवितेत बालकवींनी शब्दांची, रंगांची विलक्षण किमया साधली आहे. कवितेला अंगभूत अशी लय आहे.बालकवींनी चिमुकले या विशेषणांनी घर व गाव यांना एक बालसुलभ निसर्गरूप दिले आहे. बालकवींची ही कविता एक जैविक चैतन्य निर्माण करते.म्हणून ही कविता बाह्यर्थ संवेदना निर्माण करते.

विलास वाव्हळ

मुख्याध्यापक

विद्यामंदिर मांडा टिटवाळा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top