हल्ली स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे असे आपण बहुतांशी बोलत असतो. असे असतानाही काही अनुभव येतात की वाटते नाही, संस्काराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती नष्ट होणार नाही. माणुसकीचा ओलावा अजूनही झिरपत आहे हे नक्कीच ! लहान पण महान असा आजचा रविवारचा (१९ मार्च ) अनुभव! दुपारी मुलासोबत बाजारात गेली होती. भाजीवाले, फळवाले वगैरे सावलीला एका बाजूला बसलेले होते. पण दोन ताडगोळे फळविक्रेते भर दुपारी रस्त्याच्या कडेला ताडगोळे विकत होते. १०० रुपयाला एक डझन! खरेदी करणाऱ्यांची खूप गर्दी होती. मी बाजारहाट करून घरी परतत असताना फळवाल्याकडे गेली. त्याच्याकडची गर्दी आता कमी झाली होती. त्याचे काम चालू होते. ताडगोळे सोलून तो देत होता. सर्व ग्राहकांनी डोक्यावर टोपी, रुमाल, डोक्यावर पदर घेतलेला होता. तितक्यात दोन सफाई कामगार महिला तिथून चालल्या होत्या. त्या दोघी फळविक्रेत्याला म्हणाल्या, अरे बाबा! इतक्या तळपत्या उन्हात बसला आहात. डोक्यावर टोपी नाही, रुमाल नाही. आजारी पडाल. पैसे कमावण्याच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. १०-२० रुपयाची टोपी डोक्यावर घाला. सिर सलामत तो पगडी पचास! प्रेमवजा काळजीच्या स्वरात सांगून निघूनही गेल्या. खर तर त्या दोघीही त्याच्या कोणीच लागत नव्हत्या. पण माणुसकीचे नाते होते की जे सर्वश्रेष्ठ होते. तोपर्यंत त्याची फळेही संपत आली होती. पण त्यांनी आज माणुसकीची कमाई केली होती. आज त्यांचा फळविक्रीचा पहिलाच दिवस होता. अन रणरणत्या उन्हात मायेची सावली धरत माणुसकीचा झरा त्यांना सापडला होता. हा एक लहान प्रसंग पण खूप काही शिकवून गेला. अनुभवातून मिळालेले शिक्षण कायम लक्षात राहते.
सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.