बा. भ. बोरकर यांच्या कोवळ्या वयातच घरी घडत असलेल्या संत वाणीचे गाढ संस्कार झाले. म्हणूनच बोरकरांच्या मनात पहिली कविता उमलली ती अभंग रूपातच. पुढे त्यांनी अनेक छंदांचा, जातींचा, चालींचा अवलंब केला असला तरी अभंगाविषयीचे त्यांचे प्रेम अभंग राहिले.
व्यक्तिमत्वाच्या विविध प्रकारच्या वर्गीकरणात ‘अध्यात्मवादी’ व ‘भौतिकवादी’ असेही एक वर्गीकरण समाविष्ट केल्यास बोरकरांची गणना अध्यात्मवादी गटात करावी लागेल.अवतीभोवती असलेल्या गाथा पोथी वाचणाऱ्या कौटुंबिक वारशाने, व्रतवैकल्याने व्यापलेल्या भोवतालच्या वातावरणाने तसेच आसमंतात पसरलेल्या देवळा राऊळा मुळे आणि अवतीभोवती असलेल्या गूढरम्य निसर्गाच्या अनुभूतीमुळे बोरकरांची अध्यात्मवृत्ती वाढीस लागली असावी.अलौकिकाच्या अंगाने, निसर्ग प्रेम कवितेतील लौकिक सौन्दर्याचे अस्वादन करणे ही बोरकरांची मूळ प्रवृत्ती आहे. या प्रकृतीधर्मामुळेच कवी मंगेश पाडगावकरांना दिलेल्या मुलाखतीत “कवी हा जिवा-शिवाच साफल्य अनुभवतो तेंव्हा त्याचा अनुभव कलाकृतीतून आविष्कृत होतो; अनुभव शिवाचा, पण तो बोलतो जिवाच्या परिभाषेतून.” या सारखी विधाने बोरकर करतात.
ज्ञानेश्वरांचा समाधी प्रसंग प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या नामदेवांनी वर्णन केलेल्या लोकविलक्षण प्रसंगावर रचलेली चिरकरुण विलापीका प्रसिद्ध आहे.
ज्ञानदेव गेले तेंव्हा कोसळली भिंत
वेद झाले रानभरी गोंधळले संत
ज्ञानदेव गेले तेंव्हा आटे इंद्रायणी
मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी
ज्ञानदेव गेले तेंव्हा ढासळला निवृत्ती
आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती
ज्ञानदेव गेले तेंव्हा तडा विटे गेला
बापरखुमादेवीवरू कटीत वाकला….
बोरकर हा प्रसंग करुण्यापूर्ण पुन्हा जिवंत करतात. त्यांच्या चैत्रपुनव मधील ‘भिंत’ ही रक्ख दुपारचे वर्णन करणारी अवघ्या सहा ओळींची कविता पण या कवितेला लाभलेला ज्ञानदेवांच्या जीवनाचा आकस्मिक संदर्भ बोरकरांच्या मनोमंदिरात ज्ञानदेवांची मूर्ती किती दृढपणे स्थापित झाली आहे ते सूचित करतो.
अध्यात्माइतकाच ‘संगीत आणि निसर्ग’ हे बोरकरांच्या आवडीचे विषय आहेत. संगीताच्या परिभाषेने बोरकरांची कविता भरलेली आहे. किंबहुना संगीताच्या अनेक प्रतिमा त्यांच्या कवितांमध्ये ठायी ठायी आढळतात. जे शब्दात सांगायचे ते नादात गुणगुणायचे या कडे त्यांचा कल आहे. ” जिवंसंगीत”, ” आनंदभैरवी”, “चित्रविणा”,”गीतार” ही त्यांच्या काव्यसंग्रहांची नावे बोरकरांचे संगीत प्रेम अधोरेखित करतात.
विश्व हे एक ‘गान’ आहे. शरीर हे एक सतार आहे अशी परिभाषा त्यांच्या मुखातून येते. जीवनाला घुंगुर रसाची उपमा द्यावी असे त्यांना वाटू लागते. प्रियेने केसांवरून फिरवलेला हाताचे मुलतानी रागात परिवर्तन होते. हृदय कोकीळ बनते. पावसाच्या बरसातीतून मल्हाराची धून ऐकू येते. थोडक्यात जे जे रमणीय, अद्भुत, उदात्त, करूनकोमल आणि वेड लावणारे असते ते सारे गायनमयच होते.
संगीताप्रमाणे निसर्ग सौंदर्य व स्त्री लावण्य यांच्या मधून बोरकरांना रसपूर्ण साक्षात्कार होतो.
हळद लावूनी आले ऊन
कुंकुमाक्षता फुलांमधून
झाडांमधुनी झडे चौघडा
घूमते पाणी लावून धून
लावण्याचा लागून बाण
तृप्तीलाही फुटे तहान
मला खोवू दे तुझ्या कुंतली
एकच यांतील पान लहान
किंवा
क्षितिजी आले भरते ग
घनात कुंकूम खिरते ग
झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते ग
किंवा
समुद्र बिलोरी ऐना
धरतीला पाचवा महिना
त्यांच्या निसर्ग कवितेचे वैशिष्ट्य आहे ते त्यातील प्रादेशिकतेपेक्षा ती मधून रस डोळसपणे स्फुरणाऱ्या सौन्दर्यवेधात.
‘जलद भरुनी आले, सरीवर सरी, खिडक्यांवर वाजे वारा, झाले हवेचे दही, झाडे झाली निळी निळी क्षितिजी आले भरते ग ‘. यासारख्या कविता म्हणजे विविध प्रकारे आळवलेली पावसाची विविध रूपेच.
संसाराचा रस घ्यायचा पण त्याच्या गाळात स्वतःला रुतू द्यायचे नाही,
संन्यासाचा आनंद लुटायचा पण त्याचा सुटकीपणा स्वतःला शिवू द्यायचा नाही, जीवनाच्या प्रेमाने मोहरून जायचे पण आतला एकांत ढळू द्यायचा नाही ही बोरकरांची तत्वप्रतिज्ञा आहे.बोरकरांच्या कवितेतील राधाकृष्ण भावाचा उगमही याच विचारातून झाला असावा म्हणून ते म्हणतात
नंदाघरची बावडी ग
मी नंदाघरची बावडी ग
दिसुनी क्षणभर श्याम मनोहर
त्यासम झाली लालडी ग
बोरकरांच्या काव्यसाधनेचा मूलसरोत अध्यत्मनिष्ठ व सौन्दर्यवाद हाच आहे.वेळोवेळी तो अनेक दिशांनी प्रवाहित झालेला दिसतो आणि म्हणूच कविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर हे नाव मराठी कवितेच्या अग्रस्थानी घेतले जाते.
विलास वाव्हळ
मुख्याध्यापक
विद्यामंदिर मांडा टिटवाळा