0251 -2209396 / 2200921 | csmandal_kalyan@rediffmail.com

महाकवी कालिदास

“आषाढस्य प्रथम दिन म्हणजे महाकवी कालिदास दिन!” आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास जयंती म्हणून साजरी केली जाते .कालिदास जयंती म्हणून ओळखली जाणारी ही तिथी कालिदासांच्या स्मरणाने आणि त्यांच्या कीर्तितेजाने अशीच ऊजळून निघते.कालिदास हे संस्कृत वाङ़मयातील जणू स्वयंप्रकाशी सुर्यच होय. संस्कृत वाङ़मयाचे कविकुलगुरू, कविकुलशेखर, कुलभूषण कालिदास आषाढ मेघासारखे प्रकटले नि बरसले आपल्या ज्ञानमुकुटातून प्रत्यक्ष भगवती ञिपुर सुंदरीन साक्षात प्रतिभेच आणि काव्याच भरगच्च लेणं गीर्वाण भारतीच्या गळ्यात घातल आणि कालिदास आषाढ मेघासारखे रिमझिमू लागले! सर्वसाधारण रसिकांसमोर महाकवी ,भावकवी आणि नाटककार म्हणून एकाच कालिदासाची प्रतिभा उभी आहे खरतर कालिदास हे असाधारण विद्वान आहेत.त्यांनी संपूर्ण भारतभर साक्षेपी पणानं प्रवास केलेला आहे.त्यांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्यात विदर्भातील रामगिरीपासून तर हिमालयातील अल्का नगरीपर्यन्तच्या प्रवासाच्या खाणाखुणा मेघाला सांगताना कालिदासांनी पर्वत ,नद्या ,गावे, शहरे,यांचे मोठे मनोरम वर्णन केलेले आहे. कालिदासांना सर्वगामी ,सर्वस्पर्शी प्रतिभा लाभली होती,विद्वत्ता व रसिकता यांचा एक सुंदर मेळ त्यांच्या साहित्यात दिसून येतो. त्यांच वांङ़मय तरल संवेदनाक्षम ,अनुपम सौंदर्याचा साक्षात्कार आणि परंपरागत चिरंतन संस्कृतीच्या अविष्कारासाठी प्रसिद्ध आहे. कालिदास हे ‘भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक कवी होते असे म्हंटले तर ते यथार्थच होईल. कालिदासांच्या लोकोत्तर प्रतिभा सामर्थ्यान आणि वाग् विभवानं त्याच्या भाषाप्रभुत्वानं आणि विशाल कल्पना विलामानं लुब्ध झालेले गीतगोविंदकार कविराजराजेश्वर ,’जयदेव’ कालिदासांच वर्णन करताना म्हणतात”कालिदास म्हणजे कविता कामिनीचा मुर्तिमंत विलास आहे”.तर ‘बाणभट्ट त्यांच्या काव्याला “मधुरसांद्र मंजिरी”अशी उपमा देतात. ‘कविकुलगुरू’ हे गौरवदर्शक बिरूद कालिदासालाच लावले जाते.मेघदूत,रघुवंशम्, कुमारसंभवम्,ऋतुसंहार आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम्आणि अभिज्ञान शाकुंतलम ही त्यांनी लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत. विना वेदं ,विना गीताम् ,विना रामायणीम् कथाम्। विना कविम् कालिदासम् कीदृशी भारतीयता।। अशा प्रकारे त्यांच्या प्रतिभेची छाप भारतीयांच्या ह्रद्यावरून कधीही पुसली जाणार नाहि.असे कालिदास अवतरून ,मोहरून आणि विरून जाऊन आज कित्येक वर्ष लोटली आहेत पण त्यांना तुल्यबळ असा आजवर कोणीही कवी होऊ शकला नाहि ही खंत आजही कित्येक शतकं ,विद्वान आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कविंनीही केली आहे.

– सौ.रेणुका सचिन जोईल. सहा.शिक्षक ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण (पु)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top