अग काय बाई सांगु तुला,आमचा बंड्या हल्ली ऐकतच नाही. खूप उलट बोलतो.काय करावे तेच समजत नाही….अशीच तक्रारवजा काळजीची वाक्य आपल्या कानावर येतात. किंबहुना तुमच्या आमच्या घरातही ऐकायला येतात.ऐकत नाही,उलट बोलतात, हट्टीपण करतात.आम्ही आमच्या आईवडीलंशी असे वागत नव्हतो. काळ कुठलाही असो.. दोन पिढ्यानमध्ये अंतर असतेच.संस्कारच नाही..असे अनेक कायमस्वरूपी शिक्के मारून आपण मोकळे होतो. पण संस्कार करते कोण? ते कोणाचे अनुकरण करते? every child is special प्रत्येक मुल हे विशेष वेगळे असते. त्याचा आपण स्विकार करून त्याला योग्य मार्गावर नेणे गरजेचे आहे. बाळ जन्माला आल्यापासून किशोरावस्था येईपर्यंत आईवडिलांच्या अनुकरणाने वाढत असते. पण किशोरावस्था पोंगडवस्थेत त्याच बाळावर समाजचा अधिक पगडा असतो आईवडिल कुटुंबांची वाट धरून बाळ समाजाचा हात धरून वावरतो. अशा कोवळ्या कळीचे फूल उमलायची नैसर्गिक प्रक्रिया सहजपणे असते. पण उमलणाऱ्या ह्या कोवळ्या निरागस मुलांना फुलाना योग्य खतपाणी सूर्यप्रकाश सर्व घटक मिळाले तरच ते फुलते. अन्यथा उमलण्याआधीच त्याचे आस्तित्व नाहीसे होते. बाबांची चप्पल लेकाच्या पायात यायला लागली की मुलांशी वडिलांचे नाते असले, तरी मित्रत्वानी वागायला हवे. मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांच्याशी मित्रमैत्रिणीसारखे राहायलाच हवे. उमलत्या वयात येणाऱ्या मुलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतो .ह्या वयात मुले बिनापंखाचीच उडू लागतात. घरात थोरामोठ्यांनी चांगल्या सांगितलेल्या सवयी सल्ल्ये बोचू लागतात. पण तेच त्यांच्या वयातील मित्रांनी सांगितल तर पटते. मग अशावेळी त्यांच्यावर न रागावता त्यांना समजून घेवून, समजावून ,विश्वासात घेवून, प्रेमाने सांगितल्यास तेही एक पाऊल पुढे येतील आणि आपोआप कुटुंब, समाज ह्यात योग्य समतोल राहील. आपले मूल चांगले, संस्कारी, सुशिक्षित व्हावे ह्यासाठी प्रत्येक आईवडील धडपडत, प्रयत्तनशील असतात.पण असे असले तरी आपल्या इच्छा ,आकांक्षा त्याच्यावर लादून चालत नाही.त्याच्या आवडीनिवडी कुवत, क्षमता लक्षात घेवूनच त्यांना मार्गस्थ केले पाहिजे. त्यांनही वैयक्तिक अस्तित्व आहे ,ह्याचे भान आपल्याला पालक, समाजाचा एक घटक म्हणून आपल्या ला असलेच पाहिजे. घरातील दोन मुले, शेजारील, नातेवाईकानची मुले ह्यात तुलना करू नये. तिचे गुण बघ, तुला काही येत नाही असा नकाराचा शिक्का ठेवून त्याला जगण्याचा आनंद घेण्यापासून परावृत्त करू नका. त्याला नाराज, निराश करू नका. त्याचातील चांगले गुण, कला हेरून त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहन द्या. चित्रकला,संगीत, क्रीडा, कविता लेखन…असे अनेक कलागुण हेरून त्यास पुढे पुढे जाऊ दे . पाल्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, कोणाची संगत आहे ह्यावर लक्ष जरूर ठेवा .पण त्यांचे कठोर गुप्तहेर बनू नका. पौगंडावस्थेतील मुलांवर संगतीचा खूपच प्रभाव असतो. मुलामुलींमध्ये आकर्षण असते. त्यात प्रसारमाध्यमानचे मायाजाल आहेच. अशा वेळी त्यांच्या मित्रमडळीना घरी बोलवा. तुम्हीही ओळख करून घ्या. सहजपणे विश्वाने बोला. मैत्री मुलामुलांची असू शकते हे पारदशर्कतने स्वीकारा. पण मैत्रीचे बंध पाळत असताना अंतर्मनातील पालकत्व जागे ठेवाच. दिल दोस्ती दुनियादारी ह्या आता संपलेल्या पण मनात दोस्ती करून राहिलेल्या मालिकेची आठवण आली. निरागस विश्वासू प्रेमळ मैत्री…! उमलणाऱ्या मुलांना मोकळेपणा द्यायचा म्हणजे स्वय्राचार करू द्यायचा नाही. चांगल्या वाईटाच्या काटेरी बागरुपी समाजात फुले घेताना काटेही टोचतात तेंव्हा समाजाच्या बगिच्यावर हळुवार सावधानतेने पाऊल टाकायला आपण सहाय्य केले पाहिजे. आपण त्यांचे माळी होऊन जतन, संवर्धन केल पाहिजे.खतपाणी घालून बहरु द्यायचे. पण त्या रोपट्याला स्वतःचे अस्तित्व आहे. त्याला स्वतःला ऊनपावसातत ताऊन सुलाखून निघून जमिनीत घट्ट पाय रोवू दे आणि ताठपणे आनंदाने बहरु दे ., ह्ल्ली विभक्त कुटुंब पदधती, अर्थाजनासाठी, करीयरसाठी पालकांचे बाहेर असणे, आजीआजोबा मायेचाआधारवड घरात नसणे, मुले पाळणाघरात असतात. मुले मोबाईल, संगणक, टीवी, महागडी खेळण (एक किंवा दोन मुले, त्यांचे लाड, पालक बाहेर असतो म्हणून महागडी खेळणी आणतात. पण प्रेमाने दोन शब्द बोलत नाही) त्यात तांत्रिकदृष्ट्या मन रमवतात. अन अनेक व्याधी ओढवून घेतात. कामाहून आल्यावर जेवण, त्यांच्या कामात मग्न. मुलांशी सवांद नाही, की मायेचा स्पर्श नाही. फक्त बाहेरील राग, तणाव मुलांवर. मग विसंवाद होऊन मुले दुरावतात. लहान वयात मुलांना खूप प्रश्न पडतात .का व कसे असे अनेक कुतुहलाचे प्रश्न पडतात. त्या प्रश्नाचे निरसन प्रेमाने, न रागावता केले पाहिजे. वेळ नाही ही सबब देवू नका. ..त्यांना काय हवे, नको त्याचे मोजमाप पैशात करू नका. त्यांना वेळ द्या.त्यांचाशी बोला.प्रेमाची भूख मायेने, वात्स्ल्याने पुरवा. त्यांचे म्हणणे एकून घ्या.मुलांच्या भावनिक आंदोलनाची दखल आपण घेतली पाहिजे. त्यांना व्यक्त करण्याची संधी आपण त्यांना दिली नाही, तर त्यांच्या भावनिक गुंत्यातून वर्तनविषयक समस्या सुरु होतात. त्यांना भावनिक आधार द्या.आपोआप सर्व गुंता सहज उलगडेल. तारे जमीन पर चित्रपटात..मुलाची भावनिक अवस्था, त्याचा अक्षरांचा होणारा गोंधळ, चित्रकलेतील तारे त्याच्या पालकांना हेरता आले नाही. ते काम त्याच्या शिक्षकाने केले. तारा स्वप्रकशित आहे.त्याला झळाळू द्या. काळे ढग त्याच्या कधीच आड येणार नाहीत. मुलांचे बलस्थनाबरोबरच त्यांच्या मर्मस्थनाची योग्य जाणीव ठेवून मार्गस्थ होणे उचित आहे. मुलांना खिडकी बाहेरील अवकाश पाहू द्या . आपण मुलांना घडवित असताना, मुलंही आपल्यला घडवित असतात. हा एक पालक आणि शिक्षक म्हणून अनुभव आहे. मुलांच्या निमित्ताने आपणही स्वतःला घडवत राहिले पाहिजे. आपलं खर भविष्य म्हणजे आपली मुले .त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा सर्वच दुर्लक्षित होईल. संस्कार, शिस्त कुठे विकत मिळत नाही. ते आपल्या अनुकरणातूनच शिकत असते. त्याला मोबाईल वापरू नका म्हणता आणि तुम्ही सतत त्याच्यातच असाल तर मग काय उपयोग? मुलाला समजावून सांगा. त्याचे फायदे, तोटे समजून सांगा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. पण व्यसन जडवून घेवू नका, आहारी जाऊ नका. आहार, आरोग्य, विहार, विश्रांती हयाकडेही लक्ष द्या. स्वतः वाचन करा, मुलांना वाचून दाखवा, खेळास प्रोत्साहन द्या. जेवण एकत्र करा. पार्थना म्हणा, मुले आपोआप म्हणतील, मोठ्याच्या पाया पडतील. उमलणाऱ्या वयातच योग्य मार्गदर्शन, सवांद, मैत्रीचे हात विश्वासाने पुढे करणारे पालक पाल्याच्या आयुष्यला योग्य आकार देवू शकतात. सुसवांदपूर्णे मैत्रीनेच आजच्या यंत्र होत चाललेल्या निर्जीव आयुष्याला, संवेदनशील सजीव नैसर्गिक नात्यांची संजीवनी प्राप्ती होईल. खळाळणाऱ्या आपल्या चैतन्यपूर्ण उत्साही पाल्यरुपी आनंदाचे तित्कायचं आनदाने स्वागत करा आणि मैत्रीने त्याला फुलवा. जगण्यातील आनंद त्यालाही घेऊ द्या आणि तुम्हीही त्याच्यासोबत घ्या….!
उमलणाऱ्या वयाला लाभले फुलपाखरांचे पंख, रंगीबेरंगी फुलांवरून बागडताना झाली दिशाभूल, त्तक्षणी मायेची ,मैत्रिणीची आली मंद झुळूक अलगद झेलून आणिले अन दिले स्फूर्तीचे बळ, पुन्हा नव्याने उडाले फुलपाखरू योग्य दिशने, आत्मविश्वासाने …!
– सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.