0251 -2209396 / 2200921 | csmandal_kalyan@rediffmail.com

Blogs

नवीन शैक्षणिक वर्षारंभ शुभचिंतन... !!

नवीन शैक्षणिक. वर्ष२०१८-१९ प्रारंभ,आरंभ होतोय
पक्ष्यांचा किलबिलाट, तसाच काहीसा चिमुकल्यांचा किलकिलाट आता कानी येईल..!
गोंगाट, गोंधळ, धावपळ, पळापळ असंच काही सर्व वातावरण बालकांपासून पालकांपर्यंत…. !
शिक्षक,मुख्या.पासून अधिका-यांपर्यंत, आज पासून सर्वत्र दृष्टीक्षेपास येईल..!
नवीन शै.सत्र, प्रवेशोत्सोवाचा उदंड उत्साह, बदली होऊन नवीन शाळांत हजर झालेले मित्रवर्य, गुरुवर्य. चिमुकल्यांची हजेरी.. !
गुढ्या, तोरण, रांगोळी, सजावट अशा आनंदी,उल्हासी वातावरणात नवीन शै.सत्राची सुरुवात…. !!
आजपासून सुरू होणाऱ्या सन २०१८ -१९ या नवीन शैक्षणिक सत्राच्या.. !
सारस्वत,ऋषीतुल्य, बाळगोपाळांच्या राज्यातले संस्कार दूत असणा-या अर्थात ज्ञानेपासक ,गुरुजन बंधु,भगिनींना…. !!
सुहास्यवदनाने सुहृदय पूर्वक… !
ज्ञानदान क्षेत्रातील यशदायी,सुदीर्घ यशवंत प्रवासास मनस्वी शुभचिंतन, शुभेच्छा…. !!

Visit To Fire Station - Vashi

On 18th November, 2017 visit to Fire Station was planned for Sr. Kg students. Around 130 students attended the visit. All the Pre-Primary staff along with the students reached at Vashi fire station morning. The Fire Fighters welcomed all the students as the were thrilled to see the fire station . They showed rescue van which is used emergency to help people if they are in danger like got locked, stuck in lift, etc.,. It contained tools equipments like huge hammer, ropes etc… , and also showed huge ladder used in fire brokeout to help people escape and lastly the water tank. The officers also gave informative information about each equipment used. Students really enjoyed the visit and even dreamt to become a fire fighter in future and help the people in case of danger.

शिक्षक कार्यशाळा - १ व २ डिसेंबर २०१७

छत्रपती शिक्षण मंडळ ,कल्याण संस्थेने १ व २ डिसेंबर २०१७ रोजी नूतन कर्णिक रोड कल्याण ह्या शाळेत प्राथमिक विभाग मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.काळानुरूप आपले ज्ञान अद्यावत ठेवून ,अध्ययन अध्यापन रचनावादावर आधारित ,विद्यार्थी सुसंवाद साधणारे,ज्ञान –व्यवहार ह्याची सांगड घालणारे असावे ह्या व्यापक दृष्टीने कार्यशाळा आयोजित केली होती. १ डिसेंबर उद्घाटन सत्रात संस्थेचे चिटणीस मा.श्री.कडू ह्यांनी कार्यशाळेची आवश्यकता अनेक उदाह्र्रणाद्वारे सांगितली. संस्था कार्यकारिणी सदस्य मा.श्री.रत्नाकर फाटक ह्यांनी शिक्षक मुख्याध्यापक मनोभूमिका ,ताणतणाव व्यवस्थापन ह्या विषयावर मार्गदर्शन केले.शिक्षकांचा सक्रिय सहभाग घेतला. मानसोपचारतज्ञ डॉ.संदीप जाधव ह्यांनी विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण समस्या व आव्हान ह्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.शिक्षकांनीही आपापल्या वर्गातील विशेष विद्यार्थी वर्तणूक समस्या त्यावरील उपाय ह्यांसंदर्भात शंकाचे निरसन करून घेतले.मुलांनी हुशार असण्यापेक्षा चाणाक्ष असावे ह्यावर त्यांनी भर दिला. संस्था सदस्य मा.श्री.धंनजय पाठक ह्यांनी डिजिटल वर्ग आणि अभ्यास ह्यासंदर्भात मार्गदर्शन केले.डिजिटल वर्गाचे फायदे शिक्षक विद्याथी, शाळेला कसा होतो त्यांनी व्हिडिओ दृक्श्राव्य साधनातून दाखवून दिले.शिक्षकांनीही ह्या सत्रात सक्रिय सहभाग घेतला.MIND MAPचा वापर,आत्मविश्वासाने इंग्रजीचा वापर ह्यांसंदर्भातही चर्चा झाली. ठाणे जिल्हाधिकारी मा.सौ.मीना यादव ह्यांनीही कार्यशाळेला भेट दिली व सर्वाना शुभेच्छा दिल्या. २ डिसेंबर २०१७ रोजी मा.सौ.नीता माळी(ओक हायस्कूल शिक्षिका,तज्ञ मार्गदर्शक तालुका राज्य स्तर) ह्यांनी विद्यार्थी शिक्षक सुसंवाद ,मी ते आम्ही वाटचाल ,वाचन,स्वमूल्यमापन ,टिम व्यवस्थापन अतिशय प्रभावीपणे ,अनेक उदाहरणातून सांगितले. मा.सौ.उत्तरा गोखले (मुख्याध्यापक NRC ENGLISH PRIMARY),मा.सौ.हंसा पटेल (NRC TEACHER) ह्यांनी सेमी इंग्रजी अध्ययन अध्यापन अडचणी व उपाय ह्यावर चर्चासत्र घेतले. संस्था अध्यक्ष मा.डॉ.जोशी ह्यांनी शिक्षक कार्यशाळेला भेट दिली .सर्वाना शुभेच्छा दिल्या.वाचन,उपक्रमांची नोंद ठेवा.दोन दिवसातील सत्राचा आढावा घेतला. सत्राच्या शेवटी मा.श्री.रत्नाकर फाटक ह्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. दोन दिवसाची शिदोरी विद्यार्थ्यासाठी शिक्षक अंमलात आणतिलच व स्वमूल्यमापनाने विकसित होतील ह्या आशावादाने कार्यशाळेची सांगता झाली.

– सौ.ऋतुजा गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.

गुणवत्ता वाढ - अभिनव अविश्वसनीय प्रयोग

मुलांची उत्सुकता वाढवून अनेक नवनवीन सोप्प्या गोष्टीतुन त्यांची उपक्रमशीलता कशी वाढते. महाराष्ट्रात सज्जनगडच्या पायथ्याशी एकदम ४० शाळांत गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलणे हा काहीसा अविश्वसनीय वाटणारा प्रयोग – हेरंब कुलकर्णी एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील एकदम ४० शाळा गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलणे हा काहीसा अविश्वसनीय वाटणारा प्रयोग महाराष्ट्रात सज्जनगडच्या पायथ्याशी घडला आहे. सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या विस्ताराधिकाऱ्यांनी बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या नियंत्रणातील जिल्हा परिषदेच्या शाळांत हा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या वर्षभरात या शाळा बघण्यासाठी एकूण ८० हजार शिक्षक व शिक्षणप्रेमींनी भेट दिली आहे. – एखाद्या शाळेचा एखादा वर्ग प्रयोगशील होऊन बदलणे आपण समजू शकतो, एखादी पूर्ण शाळा बदलणे आपण समजू शकतो, परंतु एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील एकदम ४० शाळा गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलण्याचा चमत्कार करून दाखवला आहे प्रतिभा भराडे या समर्पित विस्ताराधिकारी यांनी. २००३ पासून कुमठे बिटमध्ये त्यांनी काम सुरू केले. सज्जनगडाच्या पायथ्याचा हा परिसर जिरायती शेतीचा आणि गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाचा आहे. सुरुवातीला १०० टक्के मुले शाळेत आणण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबवले. त्यातून प्रत्येक शाळेत लेजीम पथक, बालसभा असे उपक्रम सुरू झाले. अपंग मुलांवर शस्त्रक्रिया आणि तपासणी झाली. सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी झाली. त्यांच्या आजारांचे मूळ कुपोषणात सापडले. या कुपोषित मुलांना सकस आहार मिळण्यासाठी प्रत्येक शाळेसमोर परसबाग हा उपक्रम आणि पालक प्रबोधन चळवळ डॉक्टर शैला दाभोळकर यांच्या मदतीने सुरू केली. त्यातून कुपोषण कमी झाले. हळूहळू शाळेत विविध उपक्रम सुरू झाले. सर्व शाळांसाठी समान ६६ उपक्रम एकाचवेळी सुरू झाले. प्रतिभा भराडे सर्व शाळांना भेट देत मार्गदर्शन करीत होत्या. आज मुलांना नापास करायचे नाही हा निर्णय वादाचा बनलेला असताना, २००४ साली एकही मूल नापास करायचे नाही हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. मुलगी जर नापास झाली तर तिचे लहान वयात लग्न लावून दिले जाते अन् मुलगा नापास झाला तर त्याला शाळा सोडायला लावून शेतावर कामास लावले जाते; हे चित्र बदलण्यासाठी त्यांचा हा निर्णय होता. २०१० साली ज्ञानरचनावादाच्या आधारे अभ्यासक्र म बदल सुरू झाले. प्रतिभा भराडे यांना त्या समितीवर काम करता आले. ज्ञानरचनावाद आपल्या शाळांमध्ये राबवायचा असे त्यांनी ठरविले. वाई येथील अरुण किर्लोस्कर यांचे भारत विद्यालय येथे रचनावाद अवलंबिला जातो. किर्लोस्करांनी त्यांना रचनावाद समजायचा असेल तर दहा दिवस येऊन राहा असे सांगितले. त्यानुसार पहिलीच्या वर्गात बसून काय चालते याचे त्यांनी निरीक्षण केले. त्यानुसार २०११ साली त्यांच्या ४० शाळांमधील पहिलीच्या वर्गावर त्यांनी रचनावाद सुरू केला. शिक्षकांच्या अगदी बारीक-सारीक शंकांसाठी सतत बैठका घेतल्या. पहिलीच्या वर्गासाठी त्यांच्या सूचना बघितल्या तरी आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनाचा अंदाज येतो. आरसा, पावडर, कंगवा वर्गात ठेवा.. मुलांना आरशात बघायला आवडते.. वर्गात मुलांना बडबड करायला जास्तीत जास्त संधी द्या.. वर्गात रंगीत चित्रांची पुस्तके असली पाहिजेत.. गाणी आणि गोष्टी ऐकविण्यासाठी वर्गात सीडी ठेवा.. असे करत करत मुले वेगाने शिकू लागली. शिक्षकांनीही शैक्षणिक साहित्य बनविले. शाळेत तांदूळ असतो. त्याला वेगवेगळे रंग देऊन ते वेगळे करणे, मोजणे, लेखनासाठी बोटांना वळण लागावे म्हणून एकमेकीच्या वेण्या घालणे असले असे सोपे साहित्य. गणित, मराठी आणि इंग्रजी विषयात पहिलीच्या मुलांच्या क्षमता अविश्वसनीय वाटाव्यात इतक्या विकसित झाल्या आहेत. मी स्वत: या बिटमधील पोगरवाडी व दरे तर्फे परळी शाळेला भेट दिली. तेव्हा पहिलीच्या मुलांना शाळेत येऊन पाचच महिने झाले होते. तरी ‘आॅस्ट्रेलिया’ हा शब्द त्यांनी लिहून दाखवला. कोटीपर्यन्त संख्या वाचून दाखवली. गणितात समीकरणाची गणिते सोडवून दाखवली. मला इंग्रजीत प्रश्न विचारून मुलाखत घेतली. आणि हे एकाचवेळी सर्व मुलांमध्ये विकसित झाले आहे. मराठीत मुले कविता करतात आणि गोष्टी रचतात. मराठी भाषेत शब्दसंपत्ती विशेष विकसित झाली आहे. वर्तनवाद झुगारून रचनावाद स्वीकारण्याची प्रक्रि या शाळाशाळांमध्ये सुरू केली. आत्मविश्वास, आनंद, निर्णयक्षमता या गुणांचे विकसन कसे होईल यावर लक्ष केंद्रित केले. शिक्षकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, आम्ही काही शिकवत नाही पण मुलांना शिकण्याची संधी निर्माण करतो. त्यातून मुले स्वत: शिकतात. मला इंग्रजी विषयातील मुलांची प्रगती विशेष उल्लेखनीय वाटली. घरी कोणतेही वातावरण नसताना ही मुले सफाईदार इंग्रजी कशी बोलतात, यावर भराडे यांनी सांगितले की, ‘सीएलआर’ या संस्थेची यासाठी त्यांनी मदत घेतली. त्या संस्थेच्या सीडी खूप छान आहेत. मूल मातृभाषा ज्या पद्धतीने शिकते अगदी त्याच पद्धतीने मुलांना सतत ऐकवून श्रवण – भाषण पद्धतीने इंग्रजी भाषा शिकवली जाते. याचा फायदा म्हणजे या परिसरातील मुलांची इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी मराठी शाळांनाच पसंती आहे. कुमठे बीटचे हे यश हा आज जिल्हा परिषद शाळांसाठी दीपस्तंभ झाला आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी या शाळा बघितल्यावर राज्यातल्या शिक्षकांना या बिटचा अभ्यासदौरा आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले. त्यातून एका वर्षात ८०,००० शिक्षक, शिक्षणप्रेमी या ठिकाणी अभ्यासाला आले आणि राज्याच्या रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, नाशिक, यवतमाळ, बीड, रत्नागिरी यासारख्या अनेक जिल्ह्यांतील शाळांनी प्रेरणा घेऊन रचनावादाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. प्रगत महाराष्ट्र कार्यक्र म वेगाने पुढे जाऊ लागला. प्रतिभा भराडे यांनी आजपर्यंत २५ जिल्ह्यांत जाऊन शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यामुळे या बिटमधील प्रयोगांचे राज्यभर सार्वत्रिकीकरण होते आहे. ग्रामीण शिक्षणाचे हे बदलते चित्र खूप सुखद आणि आशादायक आहे. प्रयोगाचे यश प्रतिभा भराडे यांच्या या यशाचे मूल्यमापन करताना लक्षात येते की, सलग १२ वर्षे १२५ पेक्षा जास्त शिक्षकांना एकाच प्रेरणेने काम करायला लावणे हे या प्रयोगाचे सर्वात मोठे यश आहे. याबाबत भराडे म्हणाल्या की, माझ्यात आणि शिक्षकांच्या नात्यातून हे घडले आहे. कोणत्याही सक्तीने हे घडले नाही. मी अधिकारी म्हणून प्रत्येकाच्या आत असलेल्या एका चांगल्या माणसाचा शोध घेते. या रचनावादात शिक्षकांना आनंद मिळाला. त्यातून ते अधिक उपक्र म शोधत गेले. केवळ प्रबोधनपर भाषणांनी शिक्षक बदलत नाहीत. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण, शिक्षकांसोबत काम करणे आणि अडचण येईल तिथे शिक्षकाला मदत करणे यातून शिक्षक बदलत जातात. आणि ही संख्या वाढत गेली की इतर शिक्षकही बदलू लागतात. शाळांतील वाचनसंस्कृती ग्रामीण भागात असलेल्या या प्रत्येक शाळेत आज किमान सातशेपेक्षा जास्त पुस्तके आहेत. बहुतेक मुलांनी ५०० पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. अंकिता जाधव या पाचवीतल्या मुलीने तर आजपर्यंत १००० पुस्तके वाचल्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. वाचनसंस्कृती इथे इतक्या खोलवर रुजली आहे . (लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

अरण्यातील प्रकाशवाटा

आजही आपल्या देशातील काही नागरीक मुलभूत गरजांपासून दुरावलेले आहेत व अज्ञान, रोगराई, दारिद्रयात मरण यातना भोगत आहेत. अर्थात आपले आदिवासी बांधव, कुष्ठरोगी ! पण ह्या अंधारातही एक पणती बाबा आमटेच्या आनंदवनाच्या रूपाने प्रकाशाची वाट उजळते आहे. तेव्हा ह्या सेवाव्रत जोपासलेल्या श्री.बाबा आमटे ह्यांच्या कर्मपुण्यभूमीस सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने व बाबा आमटे ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष ह्याचे औचित्य साधून विवेकानंद संकुल सानपाडा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १३ जण १५ ऑगस्ट २०१४ ते १९ ऑगस्ट २०१४ ह्या कालावधीत त्यांची अभ्यास सहल पार पडली १६ ऑगस्टला आनंदवनात श्री.विकास आमटे बाबा आमटेचे सुपुत्र यांच्याशी भेट झाल्यावर लक्षात आले की, आनंदवनात कुष्ठरोग्यावर उपचार झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी, उदरनिर्वाहासाठी अनेक समाजोपयोगी प्रकल्प सुरु करण्यात आले आहे. पादत्राणे, टॉवेल, चटई रजया, धागे, तीन चाकी सायकल अशा अनेक वस्तू कुष्ठरोगी, अंध, शारीरिक अपंगत्व असलेले कुशलतेने करतात. वृध्दासाठी स्नेहसावलीसंस्था प्रेमाची सावली देते. त्यावेळी असे मनोमन आत्मपरीक्षण करावेसे वाटले की, आपल्याला हात, पाय सर्व आहे पण आपण आपल्याच स्वार्थी कोषत वावरतो. त्या कोषातून बाहेर पडून सामाजिक कार्यात कृतीशील सहभाग घ्यावा अशी दिशा व प्रेरणा मिळाली . १७ ऑगस्टला हेमलकसा ह्या ठिकाणी भेट दिली. बाबा आमटेंचे सुपुत्र श्री.प्रकाश आमटे ह्यांनी १९७३ साली लोकबिरादरी प्रकल्प सुरु केला. बाबा आमटेंचा नातू दिंगत आमटे ह्यांनी आमच्याशी सवांद साधला. ह्या संवादात असे लक्षात आले की, बाबा आमटेची तिसरी पिढीही आजोबांच्या सेवाव्रताने झपाटून, सर्व सुखाना लाथाडून पूर्ण जीवन समाजसेवेकरीता वाहून घेतले आहे. माडिया आणि गोंड ह्या अति मागास आदिवासीच्या जीवनात श्री.प्रकाश आमटे ह्यांच्या रूपाने प्रकाश उजळला. त्यांनी आदिवासींच्या मनातील भीती, अंधश्रद्धा कमी केली ,त्यांच्यावर उपचार केले. त्यांच्या पत्नीनेही त्यांनी साथ दिली . १८ ऑगस्टला सोमनाथ प्रकल्पाला भेट दिली व बाबा आमटेंचा दूरदर्शीपणा , निसर्गाचा अभ्यास पाहून थक्क झालो. सोमनाथ ह्या ठिकाणी बाबांच्या हयातीत २७ तळी बांधण्यात आली होती. टायरपासून बांधलेले भक्कम धरण पाहून तर सर्व इंजिनियर नक्कीच थक्क झाले असतील. संध्याकाळी नागपूरला श्री.हेडगेवार स्मृती कार्यालयास भेट दिली. १९ ऑगस्टला ड्रगन palace, दिक्षाभूमीला भेट दिली. चार दिवसांच्या अभ्याससहलीत फक्त ह्या ठिकाणांना भेट देणे एवढाच हेतू नव्हता तर ह्या ठिकाणांतील वास्तवरूपी अनुभव हृदयात साठवून बुद्धीरूपाने स्वत:त व आपल्या विद्यार्थी, पालकांच्या माध्यमाने समाजात उतरविणे हा आहे बाबा आमटे व त्यांच्या कुटूबांच्या निस्वार्थी मानवसेवेमुळे आदिवासी समाजातील रोग, अंधश्रद्धा कमी झालेली आहे. शिक्षणाचे महत्व पटून मुले शाळेत येऊ लागलेली आहे. तेंव्हा आपणही प्रत्येकाने ह्या समाजकार्यात हातभार लावला तर हे कार्य अधिक सहजतेने पार पडेल व अरण्यातील प्रकाशवाटा तेजोमय होतील.

– सौ.ऋतुजा रविंद्र गवस, विवेकानंद संकुल सानपाडा, नवी मुंबई.

अक्षरशाळा

आज पुन्हां आमच्या शाळेत अक्षरशाळा भरली आमचे विद्यार्थी नक्कीच मोठे तरीही अक्षरशाळेत इयत्ता मोठा शिशुचे विद्यार्थी होऊन पुनश्च मुळाक्षरे तंत्रशुध्द पध्दतीने श्री अरविंद शेलार यांच्या अक्षरशाळेत लिहीत होती अगदी मन लावून जणू वाटतं होत की फळयावरील प्रत्येक अक्षर सांगत होत अरे बाळांनो खरं माझं रूप असं आहे .२७० विद्यार्थी सहभाग असलेल्या अक्षर शाळेत विद्यार्थ्यानमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड ऊत्सुकता होती अक्षर शाळेत काय शिकणार? विद्यार्थ्यांची अक्षरे पाहिली की वाटते की नक्की पालकांनी यांना पेन धरायला शिकवला असेल का किंवा पेंसिल धरायला शिकवले असेल कारण जेवढी विद्यार्थ्यांची बोटे मोबाईल किंवा कंप्यूटर वर चालतात तितकी सुंदर रित्या वहींत चालत नाही आणि मुळात यांना लिहण्याचा कंटाळा येतो अकारण असे ही वाटुन जाते की आई ने त्याच्या पाचवीला कदाचित वहीं पेना ऐवजी मोबाईल पुजला असेल असो परंतु मोबाईलचा शालेय जीवनातील वापर वाढला आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनचं आम्ही आमच्या शाळेत विद्यार्थी च्या .बुध्दीला चालना देणारे उपक्रम राबवतो जेणे करून विद्यार्थी आपले आवड छंद जोपासतात .वाचन करतात लिखाण करतात त्यातील हा एक उपक्रम म्हणजे अक्षरशाळा होय.विद्यार्थी लिहतात परंतु काही विद्यार्थ्याचे त्यांचे हस्ताक्षर हे खूप खराब असते आणि विद्यार्थी ते चुकीच्या पध्दतीने लिखाण करतात . शेलार सरांच्या अक्षर शाळेत तंत्र शुद्ध पद्धतीने अक्षर लेखन केले अक्षरांचे अवयव त्यांची योग्य पद्धतीने जोडणीकशी केली जाते हे त्यांनी विद्यार्थ्याना विविध अक्षरांचे गट करून शिकवले दंड कशास म्हणावा अक्षरांचा देठ कोणता प्रमाणबद्ध अक्षर कसे काढावे तंत्र विद्यार्थ्याना शिकवले .दोन ओळीत अक्षर लिहीताना किती लांबी आणि उंचीचे असावे हे ही सांगितले आणि. आश्चार्याची बाब म्हणजे कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सरांणी विद्यार्थ्याकडून प्रत्येकाचा हस्ताक्षर नमुना घेतला होता आणि नंतर कार्यशाळेच्या शेवटच्या भागात पुनश्च हस्ताक्षर लिहून घेतले आणि फलऋृतीचा अनुभव आला ८५%विद्यार्थ्याच्या अक्षरात बदल झालेला दिसून आला .म्हणजे रोज पान भर शुध्दलेखन लिहले की अक्षर सुधारते हा शिक्षक आणि पालक यांचा भ्रम मोडीत निघाला .आणि तंत्रशुध्द पद्धतींने हस्ताक्षराचा सराव केला तर प्रत्येक विद्यार्थ्याचे हस्ताक्षर सुंदर येईल यात शंकाच नाही. आमचे विद्यार्थी तर शिकलेच पण शिक्षकांना ही अक्षर रेखाटना विषयी ज्ञानप्राप्त झाले. हे सर्व उपक्रम राबवित असताना आमच्या शाळेच्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ मीनाक्षि गागरे यांची साथ ,मार्गदर्शन नवीन काही करण्याची ऊर्मी ही त्यांच्या कडून आम्हांस प्राप्त होते नवनवीन संधी त्या आम्हांस प्राप्त करून देतात जर असे मुख्याध्यापक मराठी शाळांना लाभले तर मराठी शाळा कधीच बंद पडणार नाहीत तर त्या नेहमीच अग्रेसर असतील तसेच उपमुख्याध्यापक श्री निकुम ,पर्यवेक्षक भंगाले तसेच आमचा शिक्षकवृंद ,ग्रंथपाल तेलंगे यांच्या सहकार्याने असे विद्यार्थी पूरक आणि मराठी शाळा व तिचे वेगळेपण जपणारे उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवत असतो आणि आमचे पालक ही आम्हांस प्रोहत्साण देतात. ज्या प्रमाणे आमची शाळा वाचन चळवळ महाराष्ट्रांतील प्रत्येक शाळेत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याचं प्रमाणे सुंदर हस्ताक्षराची आवड, ओढ महाराष्ट्रांतील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यामध्ये रुजण्यासाठी आम्ही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहु. धन्यवाद !!

मोतीसम हस्ताक्षर आम्ही काढू संस्कार आमचे आम्ही त्यांत उतरवू जरी झालो तंत्रशील आम्ही तरी अक्षरशील आम्ही जोपासू

छत्रपती शिक्षण मंडळ नूतन ज्ञानमंदिर, कल्याण (पू )

महाकवी कालिदास

“आषाढस्य प्रथम दिन म्हणजे महाकवी कालिदास दिन!” आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास जयंती म्हणून साजरी केली जाते .कालिदास जयंती म्हणून ओळखली जाणारी ही तिथी कालिदासांच्या स्मरणाने आणि त्यांच्या कीर्तितेजाने अशीच ऊजळून निघते.कालिदास हे संस्कृत वाङ़मयातील जणू स्वयंप्रकाशी सुर्यच होय. संस्कृत वाङ़मयाचे कविकुलगुरू, कविकुलशेखर, कुलभूषण कालिदास आषाढ मेघासारखे प्रकटले नि बरसले आपल्या ज्ञानमुकुटातून प्रत्यक्ष भगवती ञिपुर सुंदरीन साक्षात प्रतिभेच आणि काव्याच भरगच्च लेणं गीर्वाण भारतीच्या गळ्यात घातल आणि कालिदास आषाढ मेघासारखे रिमझिमू लागले! सर्वसाधारण रसिकांसमोर महाकवी ,भावकवी आणि नाटककार म्हणून एकाच कालिदासाची प्रतिभा उभी आहे खरतर कालिदास हे असाधारण विद्वान आहेत.त्यांनी संपूर्ण भारतभर साक्षेपी पणानं प्रवास केलेला आहे.त्यांच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्यात विदर्भातील रामगिरीपासून तर हिमालयातील अल्का नगरीपर्यन्तच्या प्रवासाच्या खाणाखुणा मेघाला सांगताना कालिदासांनी पर्वत ,नद्या ,गावे, शहरे,यांचे मोठे मनोरम वर्णन केलेले आहे. कालिदासांना सर्वगामी ,सर्वस्पर्शी प्रतिभा लाभली होती,विद्वत्ता व रसिकता यांचा एक सुंदर मेळ त्यांच्या साहित्यात दिसून येतो. त्यांच वांङ़मय तरल संवेदनाक्षम ,अनुपम सौंदर्याचा साक्षात्कार आणि परंपरागत चिरंतन संस्कृतीच्या अविष्कारासाठी प्रसिद्ध आहे. कालिदास हे ‘भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक कवी होते असे म्हंटले तर ते यथार्थच होईल. कालिदासांच्या लोकोत्तर प्रतिभा सामर्थ्यान आणि वाग् विभवानं त्याच्या भाषाप्रभुत्वानं आणि विशाल कल्पना विलामानं लुब्ध झालेले गीतगोविंदकार कविराजराजेश्वर ,’जयदेव’ कालिदासांच वर्णन करताना म्हणतात”कालिदास म्हणजे कविता कामिनीचा मुर्तिमंत विलास आहे”.तर ‘बाणभट्ट त्यांच्या काव्याला “मधुरसांद्र मंजिरी”अशी उपमा देतात. ‘कविकुलगुरू’ हे गौरवदर्शक बिरूद कालिदासालाच लावले जाते.मेघदूत,रघुवंशम्, कुमारसंभवम्,ऋतुसंहार आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.विक्रमोर्वशीयम्, मालविकाग्निमित्रम्आणि अभिज्ञान शाकुंतलम ही त्यांनी लिहिलेली संस्कृत नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत. विना वेदं ,विना गीताम् ,विना रामायणीम् कथाम्। विना कविम् कालिदासम् कीदृशी भारतीयता।। अशा प्रकारे त्यांच्या प्रतिभेची छाप भारतीयांच्या ह्रद्यावरून कधीही पुसली जाणार नाहि.असे कालिदास अवतरून ,मोहरून आणि विरून जाऊन आज कित्येक वर्ष लोटली आहेत पण त्यांना तुल्यबळ असा आजवर कोणीही कवी होऊ शकला नाहि ही खंत आजही कित्येक शतकं ,विद्वान आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कविंनीही केली आहे.

– सौ.रेणुका सचिन जोईल. सहा.शिक्षक ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण (पु)

उन्हाळी सुट्टीतील खाऊ... ज्ञान,मनोरंजन

माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनो! सुट्टी पडली.हुश्श! संपली परीक्षा….असेच तुम्हाला वाटत असेल. हात आकाशाला लावावेत की पंख पसरून हुंदडावे,हे करू का ते करू असे झाले असेल. हो तुमच्या मनाप्रमाणे करू. तुमच्या विहरण्याला एक अचूक दिशा देऊ या. ही सुट्टी म्हणजे नवं काही चांगल शिकायची संधी आहे हे लक्षात घेवूनच लहान पण महान असे उपक्रम,कृती स्वानंदाने राबवूया …..! अशा काही उपक्रम, कृतीची यादी :-
१. सतत टि.व्ही, मोबाईल, संगणकावर खेळ खेळू नका. त्यापेक्षा प्रत्यक्ष बागेत, मैदानात सवंगडयासोबत खेळा.घाम गाळा.
२. .whatsapp वर संदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष नातेवाईकाना सस्नेह भेट द्या. प्रेमाने विचारपूस करा.दूरच्या नातेवाईकाना स्वहस्ते पत्रलेखन करा.
३. सुट्टी आहे म्हणून अंथरुणात उशिरापर्यंत लोळत पडण्यापेक्षा लवकर नियमितपणे उठा. सकाळचा सूर्योदय अनुभवा.शेतीची कामे स्वानुभवाने जगा.
४. .वहीची शिल्लक पाने शिवून पुढील वर्षीसाठी नवीन वही बनवा. सोबत भावडांनाही घ्या. कागदी पिशव्या बनवा व वापरा.
५. ह्या ऋतुतील भरपूर फळे खा व बियांचा संग्रह करा.मित्रपरिवारालाही सांगा.जूनच्या पहिल्या आठवड्यात ह्या बिया जवळच्या डोंगर, टेकडी, माळरानावर खड्डे खणून रुजत घाला. प्रवासात येता जाता ह्या बिया उधळा व पुढील हिरव्या वनश्रीसाठी समृद्ध करा.
६. गावी मोठयांच्या साहाय्याने पोहायला शिका. मातीशी नाते जोडा. मातीचे किल्ले, कलाकृती बनवा.
७. वाचन करा. आजी आजोबांच्या जवळ बसून त्यांना वर्तमानपत्र , पुस्तके, पोथी वाचून दाखवा.
८. पाणी वाया न घालवता झाडांना घाला. तेच आपले जलजीवन आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प सोबत्याच्या साहाय्याने राबवा.
९. इंग्रजी, मराठीत स्वतःची दैनंदिनी, स्वतःचे अनुभव , विचार मांडण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करा. स्वतःच स्वतःला समृद्ध करा व इतरांनाही विकसित करा.
१०. “ जुन ते सोन”.जुन्या बाटल्या , सिडी, टायर, जुन्या साड्या,ओढणी अशा विविध वस्तूपासून सुशोभनाच्या वस्तू बनवता येतील.
११. मुक्तपणे चित्र रेखाटा व स्वतःला अभिव्यक्त करा. कचरा व्यवस्थापन करा. खत तयार करा.
१२. सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून , सकाळीच उठून पक्षी किलबिलाट, निसर्गाचा आवाज ऐका. निसर्गाच्या जवळ जा, अनुभव घ्या.
१३. भांवड, सोबती , पालकांशी नियमितपणे संवाद साधा. विविध चांगले छंद जोपासा.
उन्हाळी सुट्टी आपल्यासाठी एक स्वतःची space आहे. स्वतःला विकसित करण्यासाठी . नवं काही चांगल शिकायची संधी आहे. नाविन्याचा शोध घ्या आणि ह्या नाविन्याची जोड जूनमध्ये येणाऱ्या शैक्षणिक प्रवाह….अनुभवाला द्या. अनुभवाची क्षितिजे विस्तारा!

मोतीसम हस्ताक्षर आम्ही काढू संस्कार आमचे आम्ही त्यांत उतरवू जरी झालो तंत्रशील आम्ही तरी अक्षरशील आम्ही जोपासू

छत्रपती शिक्षण मंडळ नूतन ज्ञानमंदिर, कल्याण (पू )

प्रगल्भता म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या बदलासाठी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे निरीक्षण-परीक्षण करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं नात्या मधल्या अपेक्षा सोडून देता आणि त्यागाची भावना स्वीकारता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुमचं आत्मीक सुखं नेमकं कशात आहे ते तुम्हांला समजतं.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं किती हुशार आहात, किती मोठे आहात, हे जगाला पटऊन देण्याच्या भानगडीत पडत नाही.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही इतरांकडून स्तुती आणि शब्बास्कीची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःची तुलना इतरांशी करणं सोडून देता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं स्वतःमध्ये देखील रममाण होता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला गरज आणि हव्यास यातील फरक स्पष्ठपणे जाणवतो.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं माणसांच्या बरोबर माणुसकीने बोलता, वागता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं न सुटणारे प्रश्न सोडून देता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही आपली प्रगती करत असताना इतरांना देखील मोठं करत असता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं चांगल्या गोष्टींचं निरपेक्ष भावाने,मनापासून कौतुक करता.
प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला जाणीव होते कि आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये.
आणि शेवटी अती महत्वाचे प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं अंतरीक सुखाचा संबंध भौतिक गोष्टींशी जोडणे सोडून देता.

रातवड हायस्कूलमध्ये सौरऊर्जा कार्यान्वित

छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेने १९९६ साली “माध्यमिक विद्यामंदिर रातवड” हि शाळा ताब्यात घेऊन चांगली शाळा चालविण्यास प्रारंभ केली. मधली काही वर्ष १० वी रिझल्ट वाढीसाठी प्रयत्न. नवीन इमारत बांधकामाचा प्रयत्न सुरु झाला आणि २००५ साली खासदार निधी, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून निधी व संस्था हिस्सा मिळून दोन मजली टुमदार १३ वर्गखोल्या,एक प्रशस्थ सभागृह अशी इमारत उभी राहिली. जुन्या संस्थेतून प्राप्त तीन एकर जागेचे मैदान असे सर्व घेऊन शाळा वाटचाल करीत असताना,संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रमुख म्हणून श्री. जाधव सर समाजातील दानशूर / समाजहित व्यक्तींना भेटून शाळेच्या क्रीडामहोत्सव, स्नेहसंमेलन,विविध उपक्रम इ. साठी व्यक्तींना शाळेपर्यंत प्रमुख पाहुणे म्हणून आणू लागले. त्याचा व्हायचा तो चांगला परिणाम दिसू लागला. शाळेतील शिस्त – गुणवत्तेचा परिणाम म्हणून आर्थिक देणगीत त्याचा परिणाम सुरु झाला. पाहुण्यांचा फीडबॅक हे शाळेचे वैशीष्ठ. त्यातून शाळेस आवश्यक असलेले १२५ बेंचेस, इमारतीस आवश्यक असलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य, ट्यूब, FAN, काचेचे फळे, अद्ययावत प्रयोगशाळा,स्वतःची संगणक LAB, उभी राहिली. स्वच्छ प्रसन्न वातावरणात भर घालणेसाठी ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करून तीन एकर जागेचे उत्तम मैदान निर्माण झाले. मैदानावर हिरवळ निर्माण करणे व खेळाचे मैदान वगळून काही भागात आवश्यक असलेली भाजीपाला लागवड करणेसाठी देणगीतून 3HP चा थ्री फेज कनेक्शन मिळवून भाजीपाला, हिरवळ, दर्शनी भागातील, lawn, फुलझाडे आज प्रसन्न व आनंद देण्याचे काम करतात. तीन एकर जागेला संरक्षक म्हणून जमीन मोजणी करून संपूर्ण तारेचे कुंपण लोखंडी गे चीर्याच्या बांधकामातील दर्शनी केलेला भाग शाळा आकर्षक करण्यास भर घालते. इमारत बांधून दहा वर्ष झाली म्ह्नणून औइलपेंट ने संपूर्ण हिरवागार रंगाने शाळा रंगवून ताजेतवाने वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे रंगरंगोटीला गालबोट लागेल असे एकही कृत्य कर्मचारी, विद्यार्थी वर्गाकडून अजिबात घडत नाही हे विशेष. शाळेच्या दर्शनी भागात विविध प्रकारच्या वृक्षाच्या (सावलीचे) लागवडीने शांत वातावरण बनले आहे. वनौषधी व अन्य विशेष १०० झाडे लावून विशेष प्रयोग सुरु आहे. यावर्षी त्यात भर म्हणून ३८ शेवग्याची व १० आंब्याची कलमे लावून ती जाणीवपूर्वक वाढवली जात आहे. गाडीतळ /सायकल तळ पत्रा शेड/ १४ नळ स्टड वरील पत्राशेड विशेष शोभा वाढवीत आहेत. मागील वर्षी अद्ययावत असे मुलीसाठी स्वच्छतागृह, पाच संडास, ७ मुतार्या, नळ बेसिन रोटरी क्लब माणगाव यांनी बांधून दिले. त्यात भर म्हणून या वर्षी मुलांसाठी जुन्या स्वच्छता गृहाशेजारी ‘स्वदेश’ या संस्थेकडून अद्ययावत २ संडास, ४ मुतार्याची इमारत बांधून मिळाली. सोबत १४ नळांचे कनेक्शन पैकी ७ नळांना फिल्टर केलेले swaस्वच्छ पाणी व ७ नळांना पाणी सुरु झाले. यापूर्वी रोटरीचे माध्यमातून २ LCD Projector अद्ययावत अभ्यासक्रमासह E-Learning सुरु असून, भर म्हणून आज सर्व वर्गात नेता येईल असा LCD Projector उपलब्ध होत आहे. तसेच ८ वी च्या ४२ विध्यार्थ्याना TAb चे (शै. अभ्यासक्रमासह) वाटप शिवसेना पक्षाच्यावतीने देण्यात आले आहेत. शाळा डीजिटल करण्याकडे १००% प्रयत्नरत असलेली आपली शाळा आहे. भौतिक सुविधेच्यादृष्टीने शाळेत जे शहरातील शाळेत उपलब्ध आहे ते सर्वच ग्रामीण भागातील शाळेत उपलब्ध झाले आणि विशेष क्रमाने हे सर्व स्थानिकपातळीवर पाहुणे व्यवस्था उपलब्ध करून रिलेशन, फीडबॅंक इ. चे माध्यमातून निर्माण झाले. विशेष बाब म्हणजे या महिन्यात शाळेमध्ये दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर ३ KW वीजनिर्मिती करणारी सौरऊर्जा यंत्रणा चार दिवसापासून कार्यान्वित झाली. या वीज निर्मितीतून शाळेची गरज भागून MSEB ला सुद्धा वीज विकली जाईल. टाटा पॉवर व MSEB जवळ २५ वर्षाचा करार झाला आहे. या शिवाय गरजू, गरीब विध्यार्थ्यांच्या शै. फी पोटीहि देणगी उपलब्ध होतेय. शिवाय दरवर्षी अशा मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी शहरामधून वापरायोग्य कपडे, चप्पल, शै. साहित्य मिळवून , कापड दुकानदाराकडून न विकले गेलेले परंतु उत्तम असे कपडे उपलब्ध करून देण्यात येतात. दुपारच्या पोषण आहार भोजनात आवारात पिकविलेल्या भाज्यांचा वापर केला जातो. शैक्षणिक बाबीत दहावीचा १००% निकाल परंपरा रूढ झाली असून, गेली तीन वर्ष N.M.M.S. या स्पर्धा परीक्षेत शाळा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकात आहे. संस्था पातळीवरील विविध स्पर्धामध्ये शाळेचे नाव आहे. या वर्षी महाराष्ट्र शासन स्वयं मूल्यमापन शाळा सिद्धी मध्ये ९९९ पैकी ८८७ गुण मिळवून शाळा ‘ब’ श्रेणीत आहे. भौतिक सुविधांसोबत गुणवत्तेत अधिक करण्याची धडपड सुरु असून आपणासारख्याचे मार्गदर्शन अधिक आवश्यक आहे. वरील सर्व बाबी मा. संस्थेचे माजी व आजी संस्था पदाधिकारी यांचे मार्गदर्शनामुळेच शक्य झाल्याचे मुख्याध्यापक सांगतात शाळेमध्ये १६ CCTV कॅमेरा बसविलेले असून, ८ कॅमेरे तीन एकर परिसर व ८ कॅमेरे वर्ग्खोलीतील भागावर नियंत्रण ठेवत आहेत. शाळा व परिसर ११० % CCTV कॅमेरा नियंत्रणाखाली आहे.

माणुसकीचा झरा

हल्ली स्वार्थी युगात माणुसकी लोप पावत चालली आहे असे आपण बहुतांशी बोलत असतो. असे असतानाही काही अनुभव येतात की वाटते नाही, संस्काराची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. ती नष्ट होणार नाही. माणुसकीचा ओलावा अजूनही झिरपत आहे हे नक्कीच ! लहान पण महान असा आजचा रविवारचा (१९ मार्च ) अनुभव! दुपारी मुलासोबत बाजारात गेली होती. भाजीवाले, फळवाले वगैरे सावलीला एका बाजूला बसलेले होते. पण दोन ताडगोळे फळविक्रेते भर दुपारी रस्त्याच्या कडेला ताडगोळे विकत होते. १०० रुपयाला एक डझन! खरेदी करणाऱ्यांची खूप गर्दी होती. मी बाजारहाट करून घरी परतत असताना फळवाल्याकडे गेली. त्याच्याकडची गर्दी आता कमी झाली होती. त्याचे काम चालू होते. ताडगोळे सोलून तो देत होता. सर्व ग्राहकांनी डोक्यावर टोपी, रुमाल, डोक्यावर पदर घेतलेला होता. तितक्यात दोन सफाई कामगार महिला तिथून चालल्या होत्या. त्या दोघी फळविक्रेत्याला म्हणाल्या, अरे बाबा! इतक्या तळपत्या उन्हात बसला आहात. डोक्यावर टोपी नाही, रुमाल नाही. आजारी पडाल. पैसे कमावण्याच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. १०-२० रुपयाची टोपी डोक्यावर घाला. सिर सलामत तो पगडी पचास! प्रेमवजा काळजीच्या स्वरात सांगून निघूनही गेल्या. खर तर त्या दोघीही त्याच्या कोणीच लागत नव्हत्या. पण माणुसकीचे नाते होते की जे सर्वश्रेष्ठ होते. तोपर्यंत त्याची फळेही संपत आली होती. पण त्यांनी आज माणुसकीची कमाई केली होती. आज त्यांचा फळविक्रीचा पहिलाच दिवस होता. अन रणरणत्या उन्हात मायेची सावली धरत माणुसकीचा झरा त्यांना सापडला होता. हा एक लहान प्रसंग पण खूप काही शिकवून गेला. अनुभवातून मिळालेले शिक्षण कायम लक्षात राहते.

सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.

मैत्री उमलत्या मुलांशी

अग काय बाई सांगु तुला,आमचा बंड्या हल्ली ऐकतच नाही. खूप उलट बोलतो.काय करावे तेच समजत नाही….अशीच तक्रारवजा काळजीची वाक्य आपल्या कानावर येतात. किंबहुना तुमच्या आमच्या घरातही ऐकायला येतात.ऐकत नाही,उलट बोलतात, हट्टीपण करतात.आम्ही आमच्या आईवडीलंशी असे वागत नव्हतो. काळ कुठलाही असो.. दोन पिढ्यानमध्ये अंतर असतेच.संस्कारच नाही..असे अनेक कायमस्वरूपी शिक्के मारून आपण मोकळे होतो. पण संस्कार करते कोण? ते कोणाचे अनुकरण करते? every child is special प्रत्येक मुल हे विशेष वेगळे असते. त्याचा आपण स्विकार करून त्याला योग्य मार्गावर नेणे गरजेचे आहे. बाळ जन्माला आल्यापासून किशोरावस्था येईपर्यंत आईवडिलांच्या अनुकरणाने वाढत असते. पण किशोरावस्था पोंगडवस्थेत त्याच बाळावर समाजचा अधिक पगडा असतो आईवडिल कुटुंबांची वाट धरून बाळ समाजाचा हात धरून वावरतो. अशा कोवळ्या कळीचे फूल उमलायची नैसर्गिक प्रक्रिया सहजपणे असते. पण उमलणाऱ्या ह्या कोवळ्या निरागस मुलांना फुलाना योग्य खतपाणी सूर्यप्रकाश सर्व घटक मिळाले तरच ते फुलते. अन्यथा उमलण्याआधीच त्याचे आस्तित्व नाहीसे होते. बाबांची चप्पल लेकाच्या पायात यायला लागली की मुलांशी वडिलांचे नाते असले, तरी मित्रत्वानी वागायला हवे. मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांच्याशी मित्रमैत्रिणीसारखे राहायलाच हवे. उमलत्या वयात येणाऱ्या मुलांच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतो .ह्या वयात मुले बिनापंखाचीच उडू लागतात. घरात थोरामोठ्यांनी चांगल्या सांगितलेल्या सवयी सल्ल्ये बोचू लागतात. पण तेच त्यांच्या वयातील मित्रांनी सांगितल तर पटते. मग अशावेळी त्यांच्यावर न रागावता त्यांना समजून घेवून, समजावून ,विश्वासात घेवून, प्रेमाने सांगितल्यास तेही एक पाऊल पुढे येतील आणि आपोआप कुटुंब, समाज ह्यात योग्य समतोल राहील. आपले मूल चांगले, संस्कारी, सुशिक्षित व्हावे ह्यासाठी प्रत्येक आईवडील धडपडत, प्रयत्तनशील असतात.पण असे असले तरी आपल्या इच्छा ,आकांक्षा त्याच्यावर लादून चालत नाही.त्याच्या आवडीनिवडी कुवत, क्षमता लक्षात घेवूनच त्यांना मार्गस्थ केले पाहिजे. त्यांनही वैयक्तिक अस्तित्व आहे ,ह्याचे भान आपल्याला पालक, समाजाचा एक घटक म्हणून आपल्या ला असलेच पाहिजे. घरातील दोन मुले, शेजारील, नातेवाईकानची मुले ह्यात तुलना करू नये. तिचे गुण बघ, तुला काही येत नाही असा नकाराचा शिक्का ठेवून त्याला जगण्याचा आनंद घेण्यापासून परावृत्त करू नका. त्याला नाराज, निराश करू नका. त्याचातील चांगले गुण, कला हेरून त्याला पुढे जाण्यास प्रोत्साहन द्या. चित्रकला,संगीत, क्रीडा, कविता लेखन…असे अनेक कलागुण हेरून त्यास पुढे पुढे जाऊ दे . पाल्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, कोणाची संगत आहे ह्यावर लक्ष जरूर ठेवा .पण त्यांचे कठोर गुप्तहेर बनू नका. पौगंडावस्थेतील मुलांवर संगतीचा खूपच प्रभाव असतो. मुलामुलींमध्ये आकर्षण असते. त्यात प्रसारमाध्यमानचे मायाजाल आहेच. अशा वेळी त्यांच्या मित्रमडळीना घरी बोलवा. तुम्हीही ओळख करून घ्या. सहजपणे विश्वाने बोला. मैत्री मुलामुलांची असू शकते हे पारदशर्कतने स्वीकारा. पण मैत्रीचे बंध पाळत असताना अंतर्मनातील पालकत्व जागे ठेवाच. दिल दोस्ती दुनियादारी ह्या आता संपलेल्या पण मनात दोस्ती करून राहिलेल्या मालिकेची आठवण आली. निरागस विश्वासू प्रेमळ मैत्री…! उमलणाऱ्या मुलांना मोकळेपणा द्यायचा म्हणजे स्वय्राचार करू द्यायचा नाही. चांगल्या वाईटाच्या काटेरी बागरुपी समाजात फुले घेताना काटेही टोचतात तेंव्हा समाजाच्या बगिच्यावर हळुवार सावधानतेने पाऊल टाकायला आपण सहाय्य केले पाहिजे. आपण त्यांचे माळी होऊन जतन, संवर्धन केल पाहिजे.खतपाणी घालून बहरु द्यायचे. पण त्या रोपट्याला स्वतःचे अस्तित्व आहे. त्याला स्वतःला ऊनपावसातत ताऊन सुलाखून निघून जमिनीत घट्ट पाय रोवू दे आणि ताठपणे आनंदाने बहरु दे ., ह्ल्ली विभक्त कुटुंब पदधती, अर्थाजनासाठी, करीयरसाठी पालकांचे बाहेर असणे, आजीआजोबा मायेचाआधारवड घरात नसणे, मुले पाळणाघरात असतात. मुले मोबाईल, संगणक, टीवी, महागडी खेळण (एक किंवा दोन मुले, त्यांचे लाड, पालक बाहेर असतो म्हणून महागडी खेळणी आणतात. पण प्रेमाने दोन शब्द बोलत नाही) त्यात तांत्रिकदृष्ट्या मन रमवतात. अन अनेक व्याधी ओढवून घेतात. कामाहून आल्यावर जेवण, त्यांच्या कामात मग्न. मुलांशी सवांद नाही, की मायेचा स्पर्श नाही. फक्त बाहेरील राग, तणाव मुलांवर. मग विसंवाद होऊन मुले दुरावतात. लहान वयात मुलांना खूप प्रश्न पडतात .का व कसे असे अनेक कुतुहलाचे प्रश्न पडतात. त्या प्रश्नाचे निरसन प्रेमाने, न रागावता केले पाहिजे. वेळ नाही ही सबब देवू नका. ..त्यांना काय हवे, नको त्याचे मोजमाप पैशात करू नका. त्यांना वेळ द्या.त्यांचाशी बोला.प्रेमाची भूख मायेने, वात्स्ल्याने पुरवा. त्यांचे म्हणणे एकून घ्या.मुलांच्या भावनिक आंदोलनाची दखल आपण घेतली पाहिजे. त्यांना व्यक्त करण्याची संधी आपण त्यांना दिली नाही, तर त्यांच्या भावनिक गुंत्यातून वर्तनविषयक समस्या सुरु होतात. त्यांना भावनिक आधार द्या.आपोआप सर्व गुंता सहज उलगडेल. तारे जमीन पर चित्रपटात..मुलाची भावनिक अवस्था, त्याचा अक्षरांचा होणारा गोंधळ, चित्रकलेतील तारे त्याच्या पालकांना हेरता आले नाही. ते काम त्याच्या शिक्षकाने केले. तारा स्वप्रकशित आहे.त्याला झळाळू द्या. काळे ढग त्याच्या कधीच आड येणार नाहीत. मुलांचे बलस्थनाबरोबरच त्यांच्या मर्मस्थनाची योग्य जाणीव ठेवून मार्गस्थ होणे उचित आहे. मुलांना खिडकी बाहेरील अवकाश पाहू द्या . आपण मुलांना घडवित असताना, मुलंही आपल्यला घडवित असतात. हा एक पालक आणि शिक्षक म्हणून अनुभव आहे. मुलांच्या निमित्ताने आपणही स्वतःला घडवत राहिले पाहिजे. आपलं खर भविष्य म्हणजे आपली मुले .त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा सर्वच दुर्लक्षित होईल. संस्कार, शिस्त कुठे विकत मिळत नाही. ते आपल्या अनुकरणातूनच शिकत असते. त्याला मोबाईल वापरू नका म्हणता आणि तुम्ही सतत त्याच्यातच असाल तर मग काय उपयोग? मुलाला समजावून सांगा. त्याचे फायदे, तोटे समजून सांगा. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. पण व्यसन जडवून घेवू नका, आहारी जाऊ नका. आहार, आरोग्य, विहार, विश्रांती हयाकडेही लक्ष द्या. स्वतः वाचन करा, मुलांना वाचून दाखवा, खेळास प्रोत्साहन द्या. जेवण एकत्र करा. पार्थना म्हणा, मुले आपोआप म्हणतील, मोठ्याच्या पाया पडतील. उमलणाऱ्या वयातच योग्य मार्गदर्शन, सवांद, मैत्रीचे हात विश्वासाने पुढे करणारे पालक पाल्याच्या आयुष्यला योग्य आकार देवू शकतात. सुसवांदपूर्णे मैत्रीनेच आजच्या यंत्र होत चाललेल्या निर्जीव आयुष्याला, संवेदनशील सजीव नैसर्गिक नात्यांची संजीवनी प्राप्ती होईल. खळाळणाऱ्या आपल्या चैतन्यपूर्ण उत्साही पाल्यरुपी आनंदाचे तित्कायचं आनदाने स्वागत करा आणि मैत्रीने त्याला फुलवा. जगण्यातील आनंद त्यालाही घेऊ द्या आणि तुम्हीही त्याच्यासोबत घ्या….!

उमलणाऱ्या वयाला लाभले फुलपाखरांचे पंख, रंगीबेरंगी फुलांवरून बागडताना झाली दिशाभूल, त्तक्षणी मायेची ,मैत्रिणीची आली मंद झुळूक अलगद झेलून आणिले अन दिले स्फूर्तीचे बळ, पुन्हा नव्याने उडाले फुलपाखरू योग्य दिशने, आत्मविश्वासाने …!

– सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.

हळदीकुंकू महिलासखी मेळावा, सानपाडा

छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत २१ जानेवारी २०१७ रोजी संध्याकाळी ४ ते .३० ह्या वेळेत हळदीकुंकू महिलासखी मेळावा आयोजित केला गेला होता. शाळेतून सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक स्नेह्बंध,सणातून शाळा व समाज एकत्रितपणे वाटचाल करण्यासाठी हया कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास माजी आमदार मा.संजीवनी रायकर, मा.श्री.अनिल बोरनारे (महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद मुंबई, उत्तर विभाग अध्यक्ष) श्री.शिवाजी भोसले (शिक्षक परिषद कोषांध्यक्ष) ,श्री.सौ.मतलापूरकर ,सौ.कोमल वास्कर (नगरसेविका सानपाडा), श्री.सौ.अमित जाधव (आई प्रतिष्ठान अध्यक्ष), डॉक्टर किरण चिचकर, सौ.वसुधा सावंत (सुयोग travels मालक) तसेच अनेक महिला सखी मान्यवर व बहुसंख्येने महिला सखी उपस्थित होत्या. श्रीमती रायकर madam ह्यांनी थोडक्यात पण बहुमोल असे मार्गदर्शन केले.पालकांची आपल्या पाल्याबाबतची भूमिका काय असावी,संस्कार,शिक्षण ,जागरूकता ह्यावर भर दिला. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हसत खेळत स्त्री सक्षमीकरण करणारा प्रश्नमंजुषा कार्यक्रम-होम मिनिस्टर पैठणीचा खेळ महिला पालक व शिक्षकांसाठी आयोजित केला होता. श्री.अमित जाधव (आई प्रतिष्ठान अध्यक्ष) ह्यांनी हा खेळ घेतला. उखाणे घेणे,विविध खेळ,सामान्यज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा कार्यक्रम हसतखेळत विविध फेऱ्यातून पालकवर्गातून पुढील तीन सख्या पैठणीच्या मानकरी ठरल्या:-

प्रथम क्रमांक – सौ. जया परमेश्वर तोरकड

द्वितीय क्रमांक – सौ. सिद्धी संतोष गावडे

तृतीय क्रमांक – सौ. शोभा भीमराव जाधव

तसेच शिक्षकवर्गातून सौ. ऋतुजा रविंद्र गवस ह्या शिक्षिकेने पैठणी पटकावली. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी देण्यात आली.कार्यक्रमास आलेल्या महिला सखीना वाण,गुलाबपुष्प,अल्पोपहार देण्यात आला. कापडी पिशव्यांचा वापर करावा ह्या हेतूने,पालक विद्यार्थ्याकडून कापडी पिशव्या बनवून घेण्यात आल्या होत्या.ह्या कापडी पिशव्यातूनच फळे,वाण देण्यात आले. मुख्याध्यापिका सौ.शीला ठाकूर(प्राथमिक विभाग),सौ,सुवर्षा सागवेकर (पूर्व प्राथमिक विभाग) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्गाच्या सहकार्यातून कार्यक्रम संपन्न झाला.

 

सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.

गरजवंत मुलांसाठी माणुसकीची भिंत

शाळा हसरी असावी, आनंदी असावी त्याचबरोबर शाळा बोलकीपण असावी. शाळेचे हे बोलके पण चिमुरडया मुलांच्या बडबडी मधून साकार होतच असते पण हे बोलकेपण खऱ्या अर्थाने साकारते ते शाळेतील इमारतीच्या प्रत्येक भिंतीतून… माननीय आमदार नरेन्द्रजी पवारयांच्या आमदार निधितून नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण या शाळेला संरक्षक भिंत लाभली. आदरणीय मुख्याध्यापक श्री कडू सरांच्या संकल्पनेतून आणि सहाय्यक शिक्षक श्री पवळे सरयांच्या कुंचल्यातून ही भिंत बोलकी बनली.आदरणीय मुख्याध्यापक श्री कडू सर यांच्या संकल्पनेतून ही भिंत गरजवंत मुलांसाठी माणुसकी ची बनली. आपल्याला नको असलेल्या वस्तू परंतू सुस्थितित असलेल्या वस्तू उदा: कपडे, दप्तर, पुस्तके, पेन, स्केचपेन इ.. आपल्या गरजू मित्रांसाठी या माणुसकीच्या भिंतीवर ठेवायच्या आणि गरजवंत ते घेणार, ही या भिंतीची संकल्पना.या भिंतीचा उदघाटन सोहळा २७ डिसेंबर २०१६ रोजी संपन्न झाला. या प्रसंगी मा. आमदार नरेन्द्र पवार, नगरसेविका सौ.वीणा जाधव, प्रमुख अतिथि कवयित्री सौ. रेश्मा कारखानिस, संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री नंदकुमार जोशी, आणि संस्थेचे कार्याध्यक्ष मा. श्री ना.के. फडके शाळेयसमिति अध्यक्ष मा. श्री धनंजय पाठक आणि शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री कडू सर उपमुख्याध्यापिका मा. सौ चौधरी मॅडम अणि पर्यवेक्षक मा. श्री पाटिल सर उपस्थित होते तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा सौ. वेदपाठक मॅडम आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.सौ. रहाळकर मॅडम उपस्थित होत्या. या बोलक्या भिंतींचे आणि माणुसकीच्या भिंतीचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.आज प्रत्येक शाळा “Technosavy” होत आहे. आणि म्हणुनच प्रथम फाउंडेशन या NGO तर्फे काम करणाऱ्या संस्थेने शाळेला tab आणि Tv दिला. त्यानंतर शाळेमधे इ-लर्निंग कक्षाची स्थापना केली गेली जानेवारी पासून याची प्रत्यक्ष कार्यवाही होइल. शाळेच्या उत्कर्षा साठी सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असून, यामुळेच शाळा आनंदी बनेल हसरी बनेल. यासाठी सतत धावावे लागेल कारण… थांबला तो संपला। काळ मागे लागला। धावत्याला शक्ति येइ। आणि रस्ता सापडे।

– सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.

प्रयोगशाळेचे उद्घाटन - विवेकानंद संकुल, सानपाडा

विवेकानंद संकुल सानपाडा शाळेची स्थापना ३ जुलै १९९५ साली झाली. इंग्रजी , मराठी माध्यम सकाळ , दुपार सत्रात भरते.शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.त्यात संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालकवर्ग आणि समाजाचाही महत्वपूर्ण वाटा आहे. विद्यार्थांना ज्ञानरचनावाद , कृतीयुक्त अध्ययन अध्यापन ,Activity based science learning ,कौशल्य विकसित होणे गरजेचेच आहे. MAKE IN INDIA ,DIGITAL LEARNING, मिळवलेले ज्ञान स्वतः पडताळले ,हाताळले पहिजे.म्हणूनच विद्यार्थ्यासाठी ..शाळेसाठी ग्लोबप(Glob op) तसेच सेवा सहयोग आणि आपल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण ह्यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद संकुल सानपाडा शाळा येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आणि ह्या प्रयोगशाळेचे उद्घाटन काल दिनांक २२ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी झाले. छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.नंदकिशोर जोशी सर,सरचिटणीस मा.श्री.मधुकर फडके,कार्याध्यक्ष प्राचार्य फडके सर उपस्थित होते. तसेच संस्था सदस्य ,सानपाडा शालेय समिती सदस्य मा.श्री.फाटक सर ,श्री.ढवळीकर सर (शालेय समिती सदस्य,चेंबूर एज्युकेशन सोसायटी सरचिटणीस) उपस्थित होते.ग्लोबप (Glob op) संस्थेचे डायरेक्टर मा.श्री.पियुष चौधरी , ASSOCIATE DIRECTOR श्रीमती .सोनाली दोषी ,अरेना सूर (HR) उपस्थित होते.सेवा सहयोग संस्थेचे डायरेक्टर मा.श्री,किशोर मोघे सर,इनरव्हील क्लब सदस्य श्रीमती.तस्लीम ,फायझर कंपनीचे शेणोय सर उपस्थित होते. उद्घाटन सोहळयाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य फडके सरांनी केले.सरांनी संस्थेची वाटचाल थोडक्यात सांगितली.सेवा सहयोग,ग्लोबप संस्थेचे आभार मानले. श्री.पियुष चौधरी ( Glob op) संस्थेचे डायरेक्टर त्यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेचा सदुपयोग करावा.सर्व साहित्य काळजीपूर्वक हाताळून प्रयोग निष्कर्ष पडताळून पाहावेत असे आव्हान केले. श्री.किशोर मोघे (सेवा सहयोग डायरेक्टर ) ह्यांनी विज्ञान,तंत्रज्ञान ह्याची शिक्षणाला जोड आवश्यकच आहे.विद्यार्थांनी प्रयोगशाळेचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा असे सांगितले. सन्माननीय मान्यवरांनी उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थी,शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही प्रयोगशाळेला भेट दिली. शाळा हा समाजाचा आरसा आहे.सहयोगातून सेवा जपतच शाळा आणि समाज ह्यांच्या एकत्रित सहकार्याने आज विवेकानंद संकुल सानपाडा शाळेत प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. धन्यवाद !

सौ.ऋतुजा रविंद्र गवस. विवेकानंद संकुल सानपाडा.

नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. श्री नंदकुमार जोशी यांचे मनोगत

अध्यक्षीय मनोगत नमस्कार , काल आपल्या Web-Site चे उदघाटन आदरणीय डॉ . प्रधानसरांनी केले, पहिला (Blog) अध्यक्षीय मनोगत लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर आली, ह्या जबाबदारीची जाणीव मला आहे आपणा सर्वांच्या सहकार्याने ही वाटचाल मी करू शकेन अशी खात्री वाटते . सोमैया महाविद्यालयातील शिकवणे जसे संपले तसे प्रत्यक्ष शैक्षणीक जीवनाशी फारसा संबंध राहिला नाही , तरी सुद्धा प्रबंध तपासणे, मुलांच्या M.TECH व Ph.D परीक्षेकरिता मौखिक परीक्षा घेणे अशा रीतीने अप्रत्यक्ष सहभाग ह्या क्षेत्राशी होताच . नवी मुंबईत आपल्या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात जसा प्रवेश केला तेव्हा पासून आपला संस्थेशी विविध प्रकारे संबंधित होतो . गेली काही वर्षे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होतो परन्तु —-जी वाट प्रधानसरांसारख्या शिक्षणतज्ञाने मळली आहे. त्या वाटेवर आता प्रवास करायचाच .वाट कठीण जरूर आहे पण प्रधान सरांचे , भास्कररावांचे , जोशी सरांचे, वा ठाकूर देसाई यांचे मार्गदर्शन असताना का घाबरायचे ? “व्यासांचा मागोवा घेतू , भाष्यकाराते वाट पुसतु ” असा प्रवास आधीपण अनेकांनी सुरु केलाच ना ! पाच दशकांहून अधिक असलेली प्रदीर्घ परंपरा ,पाच दशकांहून अधिक असलेली शैक्षणिक संकुले , त्या करीता कार्यरत असलेली पाच शतकाहून अधिक सहकारी वर्ग असा सगळा वैभवशाली विस्तीर्ण पसारा. हा पसारा वनवासी भागात आहे, ग्रामीण भागात आहे,शहरी भागात आहे. पूर्व प्राथमिकच्या किलबिलाटापासून प्राथमिकच्या बेरीज वजाबाकीचे तो आहे.बाल वैज्ञानिकांच्या माध्यमिकांतून तो कनिष्ठ महाविद्यालयाच्या पायरीने वरिष्ठ महाविद्यालयात पसरतो. ह्याची माहिती घेण्याकरीता आपणा सर्वांच्या भेटीसाठी प्रवासाची योजना करीत आहे. आपणासी चर्चा करून ,मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा सारे मिळून आपण ठरवूया तो पर्यत आपण सर्व हा पसारा खूप कुशलतेने सांभाळता आहातच माझ्या परीने आपण बरोबर मी ही येतों चला –

हातात हात घेऊन, हृदयास हृद्य जोडून ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो बलसागर भारत होवो । विश्वात शोभुनी राहो ।

– डॉ . नंदकिशोर जोशी

स्वच्छता अभियान आणि माझी शाळा

‘भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत .समृध्दितेने व विविधतेने नटलेल्या भारताचा मला अभिमान आहे. हि प्रतिज्ञा म्हणताना आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असण्याबरोबरच देशासाठी आपण स्वतःला करावयाची कर्तव्याविषयी जागरूकता असणे गरजेचे आहे.विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशात सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे असंख्य बाबींमुळे कच-याचे प्रमाण ,अस्वच्छतेचे प्रमाण वाढतच आहे. Cleanliness is next to Godliness-म. गांधी या घोषवाक्यास अनुसरून मा.पंतप्रधान यांनी नेमके आपल्य मर्मावर बोट ठेवून स्वच्छता अभियानाची सुरूवात केली आहे.या अभियानाचा भाग म्हणूनच महाराष्ट्रात विद्यार्थांमार्फत स्वच्छतेचा संदेश गावागावात ,घरोघरात पोहचवला जाणार आहे.राज्य शासनामार्फत शाळां शाळांमध्ये हा उपक्रम सुरू केला असून बालदिनापासून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे.विद्यार्थीच आता स्वच्छता दूत बनून स्वच्छतेबाबत समाजात जनजाग्रृती करणार आहेत. बालवयातच मुलांवर स्वच्छतेचे संस्कार रूजावेत यासाठी बाल स्वच्छता मोहिम महत्वाची आहे आणि येथूनच माझ्या शाळेत स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. परिसर का स्वच्छ ठेवायचा?कसा स्वच्छ ठेवायचा ? हे सर्व त्या विद्यार्थ्याना आधी सांगितले .कच-यामुळे रोगराई पसरते ती कशी दूर केली जाईल हे समजावून.सांगितले.ह्या सर्व गोष्टि विद्यार्थ्याना समजल्या.कुठेहि कागद किंवा अन्य कोणतीहि टाकाऊ वस्तु टाकायची नाहि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता केली.आठवड्यातील काहि तास विद्यार्थी स्वच्छतेसाठी दिला. मुले जेवणापुर्वी व नंतर,स्वच्छताग्रृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवू.लागले.हात धुण्याच्या जागी साबण,पाणी ,हातरूमाल यांची ऊपलब्धता व्हायला लागली प्रत्येक विद्यार्थ्याने तीन ते चार कुटुंबाना भेटि देऊन स्वच्छता ,आरोग्य ,निटनेटकेपणा आदि माहिती दिली.मी स्वतः कचरा करणार नाहि आणि दुस-यालाहि करू देणार नाहि .स्वच्छतेची सुरूवात मी स्वतःपासून करेन आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करेन, अशी शप्पथ या उपक्रमांतर्गत मुलांना देण्यात आली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पेन्सिलला टोक काढली तरी वर्गात कचरा टाकत नाहित त्यासाठि वेगळी सोय करतात.दप्तर वेळच्या वेळी धुणे स्वच्छ ठेवणे हे सर्व विचार विद्यार्थ्यांना समजले आणि काय? विद्यार्थीच शाळा आणि शाळेचा परिसर स्वच्छ करू लागले! या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थांबरोबर पालकांचेहि आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार आहे असा मला विश्वास वाटतो.

– रेणुका जाईल

शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.शिक्षण ह्या व्यापक प्रक्रियेतील विद्यार्थी ..प्रत्येक मूल हे आपल्या गतीने वयानुरूप शिकत असते.प्रत्येक मूल हे विशेष असते.Every child is special.सध्याच्या आधुनिकीकरणाच्या काळात दर सेंकदाला नवनवीन ज्ञानाचा स्फोट होत आहे.अशा वेळी पारंपारीक शिक्षण पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यकच आहे. शाळेतल्या शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड देण्यावाचून गत्यंतरच नाही.अर्थात शिक्षकाची भूमिकाही तितकीच महत्वपूर्ण आहे.अद्यावत माहिती आणि ज्ञान मिळवून देणारा ,विचार करायला लावू शकणारा आणि शिक्षणाची गोडी निर्माण करू शकणारा उत्तम मार्ग म्हणजे नवीन तंत्रज्ञान . शिक्षणाच्या ठराविक पद्धतीच्या चाळण्यामधून शेवटी मुलांपर्यत पोहोचणारी माहिती आणि कौशल्ये खूपच मर्यादित असतात.डिजिटल तंत्रज्ञानामुळे अथांग माहितीची आणि ज्ञानाची कवाडे उघडली आहे.वेगवेगळ्या स्त्रोतामधून येणारे ज्ञान मूल आपल्या गतीने आणि आपल्या कलेने शिकू शकतात.शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात तंत्रज्ञान वापरण आवश्यक आहे. महात्मा गांधीनी तर आधीच त्यांच्या काळातच कृतियुक्त शिक्षण,स्वाबलंबन ह्यावर भर दिला होता.आता जुन्या पारंपारीक शिक्षणपद्धतीला छेदून कृतियुक्त,कौशल्याधिष्ठीत,ज्ञानरचनावादी,तंत्रस्नेही पद्धतीचा अवलंब केल्यास विद्यार्थी फक्त परीक्षार्थी,घोकंपट्टीचा पोपट न होता आदर्श नागरीक होईल .मिळवलेले ज्ञान व्यवहारात उपयोगी आणेल. मेक इन इंडिया,स्टार्ट अप इंडिया ,कौशल्य विकास हे सर्व अंमलात आणण्याचे मूलाधार म्हणजे शिक्षण ….शाळा ! ज्ञान आणि अनुभव यांची सांगड जो घालून देतो तोच खरा शिक्षक.ह्यासाठी शिक्षकांनीही तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे किंबहुना बरेच शिक्षक नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या अध्यापनात करतात.एक चित्र हजार शब्दांचे काम करते.हल्ली संगणक ..नेट,यु टयुब,व्हिडीओ कॉन्फरन्स,प्रोजेक्टरचा वापर ,ई लर्निंगचा वापर होतोय.त्यात ग्रामीण,शहरी असे काही नाही.सर्वत्र ह्या सुविधाचा वापर होतोय.मोबाईलचा उपयोग सहेतुकपणे शिक्षणासाठी सहज करू शकतो.कविता,गाणी,शिक्षणविषयक अनेक संदर्भ डाऊनलोड करून विद्यार्थांना उपलब्ध करून देवू शकतो. हल्लीच खाजगी इंग्रजी शाळांतील १५ हजार विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये प्रवेश घेतला आहे.त्याला कारणच हेच आहे —शिक्षणाला नवीन तंत्रज्ञानाची जोड,शिक्षकांची मेहनत,मराठी शाळांमधील गुणवत्ता वाढते आहे..महाराष्ट्रातील सर्वच शाळांनी सरल प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांची माहीती भरली .ट्रान्स्फर रिक्वेस्टने जुन्या नवीन विद्यार्थांची नोंद केली,संचमान्यता फायनलायझ केली.हे सर्व आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून केले.शासनाने दिलेल्या एका लिंकवर सर्व माहिती भरली.महाविद्यालयीन प्रवेश,अनेक शिष्यवृत्ती अर्ज आपण संगणकाचा वापर करून भरतोय. शिक्षण तंत्रज्ञानाच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रणेत्या मा.वसुधा कामत ह्यांचे म्हणणे आहे की, Learning is innate.ते शिकवावे लागत नाही.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते आणि जसे पाहिजे तसे त्या पद्धतीने शिकण्यासाठी मदत करणे हे शिक्षकांचे काम असते .शिक्षकांना पर्यायच नाही . शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाचा दर्जा वाढविणे क्रमप्राप्तच आहे .शाळा, संस्था ह्यांचे स्वतःचे संकेतस्थळ असते,ज्यामुळे समाजाला शाळा ,संस्थेची माहिती मिळते,उपक्रम,कार्यक्रमाची ,गुणवतेची पोच मिळते.नवीन प्रवेश वाढतात .तंत्रज्ञानामुळे शिक्षणाची गोडी वाढेल,कौशल्य विकसित होतील.सामाजिक संदेश ,त्यांची कार्यवाही त्वरीत करता येईल.उदा.कचरा व्यवस्थापन,स्त्रीभ्रूणहत्या……. शिक्षण पद्धतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळालयास शिक्षणाची गुणवत्ता वाढेल,मराठी शाळासमोरील आव्हाने संपुष्टात येतील.शाळा,शिक्षकांचे भविष्य सुरक्षित होईल.ग्रामीण.शहरी शाळांचा सांकव समांतरपणे वाटचाल करेल.भावी पिढी बुद्धिवादी..कौशल्यविकसित असेल.फक्त परीक्षार्थी घडणार नाही हे नक्कीच!

धरू विज्ञानाची कास, आस आम्हा नवीन तंत्रज्ञानाची ध्यास गुणवत्तापूर्णे शिक्षणाचा …!

– सौ.ऋतुजा रविंद्र गवस.

Find us

Tilak Chowk, Kalayn(w), Maharashtra 421301

Call us

0251 - 2209396 / 2200921

Mail us

csmandal_kalyan@rediffmail.com

Scroll to Top