Our School
१. अभिनव विद्यामंदिर पारनाका, कल्याण.
मुख्याध्यापकाचे नाव: श्री. संपत आनंदा गीते
UDISE No: 27210602308
स्थापना वर्ष: १९६०
शैक्षणिक वर्ष: २०२३-२४
शिक्षक संख्या: २३
शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या: ८
विद्यार्थी संख्या: ६१६
तुकड्या: १३
Email ID : abhinavvidyamandir1617113@gmail.com
“मागेल त्याला शिक्षण” या ध्येयाने कल्याण मध्ये छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना १ मे १९६० रोजी झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते मा, अध्यक्ष डॉ. भा. का. मोडक व उपाध्यक्ष मा. कृष्णराव धुळप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरु करायचा निर्णय घेवून तात्पुरती म्हणून मिळालेली श्री लक्ष्मी व्यंकटेश प्रेसची जागा वापरण्याजोगी केली. सार्वानुमते कोणत्याही प्रकारची देणगी न घेता व गुणांच्या कमतरते करता प्रवेश न नाकारता सर्वांसाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला व पहिली शाळा सुरु केली. छत्रपती शिक्षण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या अभिनव कार्याचा शुभारंभ म्हणून श्री प्रभाकर संत व श्री भाऊ सबनीस यांनी शाळेचे नाव अभिनव विद्यामंदिर असे ठेवले.मा. श्री भाऊराव सबनीस व इतर कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने टिळक चौकात व कै. श्री. राजाभाऊ भिडे यांनी देणगी म्हणून शाळेला जागा दिली. दुसऱ्याच वर्षी शाळा स्वतःच्या वास्तूत आली. शाळेच्या इमारतीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे थोर शिक्षण तज्ञ मा. श्री गोर्धन पारीख यांच्या हस्ते झाले. शाळेची सुरुवात झाली परिसरातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची गंगा खुली झाली. पारनाक्यावरील अभिनव शाळेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हि वास्तू थोरले बाजीराव पेशवे यांच्या विवाह प्रसंगी जानवसा उतरवणीकरीता इनामदार जोशी यांनी बांधलेली वास्तू आहे. थोरले बाजीराव पेशवे हे श्री जोशी यांचे जावई. सौ. काशीबाई साहेब या या जोशी यांची माहेरवाशीण. त्यामुळे कल्याणातील पहिला नील फलक आमच्या शाळेच्या इमारतीवर लागलेला आहे. सध्या पारनाका येथे सुसज्ज इमारतीत सुरू असलेल्या अभिनव विद्यामंदिर या शाळेत नियमित अभ्यासक्रमासोबतच कौशल्यविकास आभ्यासक्रम, विविध सहशालेय उपक्रम, बाह्य परीक्षा, विज्ञान प्रश्नमंजुषा, शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवचरित्राचे वाचन, जागतिक योग दिन,गुरुपौर्णिमा,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, महाकवी कालिदास दिन, मराठी राजभाषा दिन, महिला दिन तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे पर्यावरण दिन, स्वच्छता अभियान यासारखे विविध उपक्रम या माध्यमतून विद्यार्थी विकास साधला जातो.
२. नूतन विद्यालय, कर्णिक रोड, कल्याण.
मुख्याध्यापकाचे नाव: सौ. रेश्मा हनीफ सैय्यद
स्थापना वर्ष: १९६१
शैक्षणिक वर्ष: २०२३-२४
शिक्षक संख्या: २६
शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या: ०६
विद्यार्थी संख्या: ६८४
तुकड्या: १९
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल ९७ % घोषित झाला
दिनांक १३ जून १९६१ रोजी स्थापन झालेल्या नूतन विद्यालय कर्णिक मुरबाड रोड व सिंधी गेट परिसरातील विद्यार्थ्यांना अविरतपणे ज्ञानदान रोड करण्याचे काम करत आहे. कर्णिक रोड, मुरबाड रोड व सिंधी गेट या परिसरात एकही माध्यमिक शाळा नव्हती. वस्ती तुरळक होती. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांना दूरवरच्या शाळेत शिक्षणासाठी जाव लागत असे. या परिसराचा शैक्षणिक विकास घडवायचा असेल तर या विभागात माध्यमिक शाळेची नितांत गरज होती. म्हणून छत्रपती शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी नूतन विद्यालय सुरु केले. कल्याणचे दानशूर प्रतिष्ठित नागरिक मा. श्री. प्रभाकर संत व कर्णिक कुटुंबीयांनी उपलब्ध करून दिलेल्या विस्तीर्ण भूखंडावर शाळेची संपूर्ण इमारत डौलाने उभी आहे. या विद्यालयाच्या मदतीसाठी मैदानावर बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्रावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या मैदानावर सुप्रसिद्ध गायक श्री. सुधीर फडके यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दादा कोंडके यांचे गाजलेले नाटक “ विच्छा माझी पुरी करा” या नाटकाच्या प्रयोगातून २,००० रु ची देणगी शाळेस मिळाली होती. या कार्यक्रमाच्या मदतीतून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य प्रयोग साहित्य, वाचनालयाची पुस्तके खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. सध्या शाळेमध्ये डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, गणित ऑलिम्पियाड परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS शिष्यवृत्ती परीक्षा NTS परीक्षा, विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा, भारत विकास परिषदेचा भारत को जानो स्पर्धा व्हर्च्यूअल सायन्स एक्झिबिशन, सामाजिक बांधिलकी जोपासणारे विविध उपक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो.
३. ज्ञानमंदिर हायस्कूल कोळसेवाडी, कल्याण.
मुख्याध्यापकाचे नाव: पितळे माधुरी हेमंत
स्थापना वर्ष: १९६२
शैक्षणिक वर्ष: २०२३-२४
शिक्षक संख्या: ०८
शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या: ०३
विद्यार्थी संख्या: १९४
तुकड्या: ६
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल ८८ % घोषित झाला
कोळसेवाडी परिसरात कोळसेवाडी, सिद्धार्थनगर, जिम्मी बाग, चिंचपाडा, काटेमानिवली, तिसगाव या परिसरात तुरळक लोकवस्ती होती. लोक तिथे राहणे पसंद करीत नसत. शिवाय रेल्वेच्या सहा लाईन व दोन बोगदे यामुळे या परिसराचा विकास लवकर होईल असे लोकांना वाटत नसे. या भागात प्राथमिक शिक्षणाची सोय म्हणून एकच प्राथमिक शाळा सुरुवातीला होती. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कल्याण पश्चिमेला जावे लागत असे. याचा विचार करून छत्रपती शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपेक्षित अशा कोळसेवाडीत ज्ञानमंदिर हायस्कूल शाळेची स्थापना केली. विविध उपक्रम करणाऱ्या या शाळेने निरनिराळ्या विषयांवर शैक्षणिक प्रकल्प तयार केले. शैक्षणिक वर्ष २००७-०८ साली तयार केलेला गृहप्रकल्प सर्वांचे आकर्षण ठरला होता. १० सप्टेंबर, २००८ रोजी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय आजी आजोबा दिन विशेष कार्यक्रम म्हणून स्मरणात राहणारा आहे. विविध शिष्यवृत्ती परीक्षा, सहशालेय उपक्रम, सूर्यनमस्कार स्पर्धा, थोर नेत्यांच्या जयान्तीव पुण्यतिथी निमित्त आयोजित विविध स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, पोवाडा सादरीकरण, बाल दिन या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्न करीत असते.
४. नूतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कल्याण पूर्व.
मुख्याध्यापकाचे नाव: सौ. गागरे मीनाक्षी एकनाथ
स्थापना वर्ष: १ ऑगस्ट, १९८८
संस्थेच्या ज्ञानमंदिर हायस्कूल कोळसेवाडी शाळेचा वाढता विस्तार लक्षात घेता तसेच कल्याण परिसराचा वाढता विकास विचारात घेता अधिक एका शाळेची त्या परिसरात गरज निर्माण झाली होती. म्हणून छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी १ ऑगस्ट, १९८८ पासून नूतन ज्ञानमंदिर शाळेची सुरुवात झाली. शाळेच्या वाटचालीमध्ये काही उल्लेखनीय कार्यक्रमही झाले त्यामध्ये सन १९८९-९० मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी व महत्मा फुले स्मृती शताब्दी निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व त्याचप्रमाणे त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन शाळेने भरविले होते.१९९५-९६ या शैक्षणिक वर्षात २४ ऑक्टोबर रजी खग्रास सूर्यग्रहण दर्शन व त्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज सप्त शताब्दी संजीवन समाधी सोहळा निमित्ताने आळंदी येथे शाळेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल वाढवा म्हणून शाळा विविध उपक्रम राबवीत असते. पर्यावेक्षित अभ्यासवर्ग, साप्ताहिक परीक्षा, मे महिन्यातील व दिवाळी सुट्टीतील ज्यादा तासिका, आभ्यास शिबिरे, मार्गदर्शन वर्ग चित्रकला परीक्षा, बाह्य परीक्षांना विदयार्थ्यांना बसविले जाते. पर्यावरण विषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जाते. मातृ विश्वस्त संस्था निगडी पुणे यांचे जिल्हा स्तरावरील समूहगान स्पर्धेत शाळेस उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले होते. साहित्य परिषद डोंबिवली तर्फे आयोजित बाल कविता स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले होते. इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ लेझीम म्हणून काळ्याण शहरातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. लोकमत समूह वृत्तपत्राद्वारे आयोजित संस्काराचे मोती या उपक्रमात चौधरी योगेश पुंडलिक या विद्यार्थ्यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते. थोर नेत्यांच्या जयंती – पुण्यतिथी निमित्त विविध सहशालेय कार्यक्रमांचे आयोजन. सामाजिक बांधिलकी जोपासणारे विवध उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो.
५. नवजीवन विद्यामंदिर कल्याण
मुख्याध्यापकाचे नाव: ब्रम्हदेव फुलसागर
स्थापना वर्ष: १ ऑगस्ट, १९८८
कल्याणमधील स्री शिक्षणाचा पाया रचण्याचे महत्वपूर्ण काम स्री शिक्षण मंडळाने केले. शिक्षित स्री आपले कुटुंब, समाज यांच्या प्रगतीस सहाय्यभूत होते. स्रियामधील अज्ञान, आनारोग्य दूर करून त्यांना स्वयंपूर्ण करण्याची अपरिहार्यता १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णासाहेब कर्वे यांची कार्याने भारतीय समाजमनावर ठसली होती. ८० वर्षापूर्वी कल्याणमध्ये मुलींच्या इंग्रजी शिक्षणासाठी जेंव्हा बिलकुल सोय नव्हती तेंव्हा काही पालकांच्या आग्रहास्तव कु.बनुताई देशपांडे यांनी हे स्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले आणि दिनांक ११/११/१९३२ रोजी शिवाजी वाचनालयाच्या जागेत प्रथम मुलींकरिता इंग्रजी शाळा सुरु केली. याच शाळेचे दिनांक १ एप्रिल २००६ पासून या गर्ल्स इंग्लिश स्कूल चे छत्रपती शिक्षण मंडळाच्या परिवारात विलीनीकरण झाले अगदी कमी वेळात सुसज्ज अशी इमारत उभी राहून शाळा दिमाखात सुरु आहे. गुणवत्ता वाढीसाठी ज्यादा तासिका, आठवडी परीक्षा, शाळाबाह्य परीक्षा, सहशालेय उपक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्न करीत आहे.
६. श्री. रा. साठे माध्यमिक विद्यालय, डोंबिवली (पूर्व)
मुख्याध्यापकाचे नाव: सौ. सुजाता घैसास
स्थापना वर्ष: १ ऑगस्ट, १९८८
शैक्षणिक वर्ष: २०२३-२४
शिक्षक संख्या: १३
शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या: ०५
विद्यार्थी संख्या: ३१०
तुकड्या:०८
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल मार्च २०२३ ८७.२० %
मुंबई परिसरात ज्या गावाचे नागरीकरण किंवा शहरीकरण वेगाने झाले ते गाव म्हणजे डोंबिवली. सेवानिवृत्त तसेच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनी साधारणपणे ५० वर्षापूर्वी डोंबिवलीत छोटे छोटे भूखंड घेवून स्वतःचे घरकुल उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे डोंबिवली गावाचे डोंबिवली नगरात रुपांतर झाले.गावात वस्ती वाढू लागल्याने साहजिकच शाळांची गरजही निर्माण झाली. डोंबिवलीत शाळांची गरज व त्याहीपेक्षा मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता लक्षात आल्यामुळे छत्रपती शिक्षण मंडळाने दिनांक १२ जून १९६७ रोजी डोंबिवलीत मुलींसाठी कन्या शाळा सुरु केली. शाळेच्या इमारत बांधकामासाठी डोंबिवली येथेच जागेचा शोध सुरु होता. राजाजी पाठ येथील श्रीमती गोदावरी साठे व त्यांचे बंधू दत्तात्रय साठे यांच्या स्मरणार्थ ७ गुंठे जागा दिली. विदयार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शाळा विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजनही करते. पर्यावरण विषयक जागृती मुलांमध्ये निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन, संस्कृत भाषा साप्ताह, थोर नेत्यांच्या पुण्यतिथी, वाचन प्रेरणा दिन, संविधान दिन, हस्ताक्षर व निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत भित्तीपत्रके व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. शाळेने सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिली २५ वर्षे घरात समाजात उपेक्षित असलेल्या मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे काही मुलींच्या पिढ्या संस्कारित झाल्या. अनेक मुलीनी विविध क्षेत्रात चांगले यशही मिळविले. या शाळेत डोंबिवलीत राहणारे विद्यार्थी तर शिकतातच पण त्याच बरोबर आयरे, नांदिवली, खंबळपाडा, कोपरी गाव, भोपर गाव, दातिवली तसेच दिवा ठाकुर्ली, पिसवली येथूनही विद्यार्थी येतात. 1992 नंतर शाळेत येणारे विद्यार्थी हे उपेक्षित वस्तीतील, ग्रामीण भागातील असल्याने शाळेतील शिक्षकांनी विशेष मेहनत घेवून आशा विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यावर भर दिला आहे. आजही आपली ही शाळा ग्रामीण व तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी आशा स्थान आहे. आजच्या संगणकीय युगातही या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे कार्य शाळा करीत आहे.
७. मो. कृ. नाखवा हायस्कूल, ठाणे.
मुख्याध्यापकाचे नाव: : श्री. बबन निकुंब
शैक्षणिक वर्ष: २०२३-२४
शिक्षक संख्या: ०६
शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या: ०३
विद्यार्थी संख्या: १२६
तुकड्या: ०६
माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२३ चा निकाल – ६६.६६%
ठाणे पूर्व येथील कोळीवाडा भागात एकही माध्यमिक शाळा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण थांबत असे. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. या परिसरात विद्यार्थ्यांची शिक्षणाची होणारी हेळसांड लक्षात घेवून मोतीराम शेठ नाखवा व त्यांचे पुत्र स्व. दत्तूशेठ नाखवा हे शिक्षण प्रेमी असल्याने त्यांनी शाळेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सन १९६७-६८ मध्ये शाळेचे वर्ग नाखवांच्या राहत्या घरात सुरु झाले. तेथील जागा कमी पडू लागल्याने नाखवांनी टिळक नगर परिसरातील जागा उपलब्ध करून दिली. शाळेच्या इमारतीची वाढ होण्याचे कारण म्हणजे त्या काळात मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या कमी होती म्हणून ठाणे पूर्व भागाप्रमाणेच खारेगाव मुंब्रा दिवा आणि मुंबईतील पवई पर्यंतचे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे एकेकाळी आपल्या संस्थेचे सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेली शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जात होते. शाळा विविध उपक्रमांद्वारे विद्यादानाचे काम मेहनती शिक्षकाद्वारे करत आहे.शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतील आहेत. अनेकांचे पालक अशिक्षित असल्याने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करीत आहे. आठवडी परीक्षा, ज्यादा तासिका, ppt व video यांच्या सहय्याने शिक्षण,संकल्प पर्यावरण यासारखे उपक्रम विविध सहशालेय उपक्रम तसेच माझी वसुंधरा उपक्रम वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान विषयक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा शाळा नेहमीच प्रयत्न करीत आहे. १९६७-६८ साली असलेला ठाणे पूर्व भागाचे आज पूर्णपणे कायापालट झाला आहे. या विकासात व प्रगतीत स्थानिक भूमिपुत्र मागे न राहता विकसित झाल्याचे श्रेय कोळीवाड्यातील नागरिक नाखवा शाळेस देतात.नाखवा हायस्कूलने जे संस्कार दिले त्यामुळे ठाणे पूर्व भागात सुसंस्कृतपणा निर्माण झाला. सुरुवातीपासूनच नाखवा हायस्कूलने वंचितांच्या शिक्षणाचा वसा घेतला आहे, तो अजुनही चालू आहे. ठाणे पूर्व च्या शैक्षणिक इतिहासात नाखवा हायस्कूलचे कार्य महत्वपूर्ण ठरले आहे.
८. माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा
मुख्याध्यापकाचे नाव: : श्री. विलास विठ्ठल व्हावळ
शिक्षक संख्या: ०७
शिक्षकेत्तर कर्मचारी संख्या: ०३
विद्यार्थी संख्या: ३०५
तुकड्या: ०७
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२३ निकाल – 100%
ठाणे जिल्ह्यात सिडकोने नवी मुंबई विकसित करण्यास ४० वर्षापूर्वी सुरुवात केली. एक महानगर आकारास येत होते. वस्ती वाढत होती. जान्तेच्या गरजा भागविण्यासाठी सिडको नियोजनानुसार कार्य करीत होती. तेवढ्याच प्रमाणात शिक्षणाची गरजही भासत होती. म्हणून छत्रपती शिक्षण मंडळाने ३ जुलै १९९५ रोजी नवी मुंबई सानपाडा येथे सिडकोच्या नियमांचे व निकषांचे पालन करीत शाळा सुरु केली. सिडकोच्या अटीनुसार इंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमाच्या शाळा सुरु करण्यात आल्या. शाळेत येणारे विद्यार्थी हे सानपाड्यात नव्याने वसाहतीत राहावयास आलेले तसेच सानपाडा गावातील होते. पालक सभा घेवून इंग्रजी व मराठी माध्यमाची फी निश्चित करण्यात आली. सानपाडा परिसरात मराठी व इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा असल्याने विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढती होती. २००१ साली संस्थेने बांधकाम करून पहिला मजला बांधून प्रयोगशाळा, संगणक कक्ष व ग्रंथालय सुरु केले. २००३-०४ मध्ये शाळेच्या सभागृहाचे काम पूर्ण झाले. शालेय गुणवत्ता व शिस्त लावून विद्यार्थ्यांना शिक्षित व संस्कारित करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली. परिसरामध्ये शाळा लवकरच नावारूपाला आली. विविध मान्यवरांच्या शाळेस नेहमीच भेटी होत असल्याने शाळेस अनेकांच्या विविध माध्यमातून सहकार्य लाभत गेले. २००७ साली माध्यमिक शालांत परीक्षेत कु. प्रियंका बाळकृष्ण भोवड ही विद्यार्थिनी शालांत परीक्षा गुणवत्ता यादीत मुंबई विभागात सातवी तर नवी मुंबई विभागात पहिली आली. ही संकुलाच्या दृष्ठीने अभिमानाची बाब आहे.
९. विद्यामंदिर मांडा टिटवाळा
मुख्याध्यापकाचे नाव: : श्री. औटी
शिक्षक संख्या : ३९
शिक्षकेत्तर संख्या – ०८
विद्यार्थी संख्या- १,७७५
तुकडी संख्या- २७
माध्यमिक शालांत प्रामाणपत्र परीक्षा मार्च २०२०३ चा निकाल ९८.९७ %
कल्याणपासून अवघ्या १४ किमी अंतरावर वसलेलं टिटवाळा तसं खेडेगावच पण आता महानगरपालिका क्षेत्रात विसावलेलं. यागावात पूर्वी शिक्षणाचा तसं फारसं महत्व नव्हतं. प्रसारही नव्हता. मुलगी एखाद्या वर्गात नापास झाली की पुढची शिक्षणाची कवाडे तिच्यासाठी बंद. ७ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कल्याण येथे जावे लागत होते. कारण गावात शाळा नसल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाची खूपच गैरसोय होत होती. याचा विचार करून मागेल त्याला शिक्षण या ब्रीद वाक्याने प्रेरित झालेल्या आपल्या संस्थेने पुढाकार घेवून जून १९६२ साली विद्यामंदिर शाळेचे स्थापना केली. हळूहळू वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या कमी पडू लागल्याने त्यावेळचे स्टेशनमास्तर श्री पांगरे यांची जागा उपलब्ध झाली आणि त्या जागेत शाळेचे वर्ग भरू लागले. शाळेची गुणवत्ता आणि शिक्षकांच्या मेहनती वृत्तीमुळे शाळेचे विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत होती. म्हणून स्टेशन जवळ जंगल खात्याची जमीन होती. ती जर शाळेस मिळाली तर शाळा स्टेशन जवळच होईल आणी स्टेशनच्या दोन्ही बाजूंच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. हा दृष्ठीकोन समोर ठेवून फोरेस्ट खाते आणि जिल्हाधिकारी यांच्याशी अनेक पत्रव्यवहार केल्याने फोरेस्ट खात्याने स्टेशनजवळच् एक एकर जमीन शाळेस दान दिली. त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन झाले. शाळेच्या गुणवत्तेमध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे. या शाळेमध्ये मांडा. घोटसई,बल्याणी, बनेली, नांदप, आंबिवली, खडवली, निंबवली,फळेगाव, कोंढेरी, वासुंद्री, सांगोडा या गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आजमितीला टिटवाळा येथे १० माध्यमिक शाळा आहेत. शाळेच्या इमारतीही चांगल्या आहेत पण आपल्या शाळेची प्रगती. १० वी चा नेहमीच वाढता निकाल त्यामुळे विद्यार्थी संख्या नेहमीच वाढत आहे. सध्या शाळेमध्ये १,७७५ विद्यार्थी शिक्षण घेत असून २७ तुकड्या आहेत. शाळेमध्ये सेमी इंग्रजी असून संस्कृत विषयाचेही अध्यापन केले जाते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्न करीत असते. ज्यादा तासिका, आठवडी परीक्षा, शाळाबाह्य परीक्षांना विद्यार्थी बसवून त्यांची शाळेतच तयारी करून घेतली जाते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,स्काउट गाईड च्या माध्यमातून श्रमाचे महत्व पटवून देणारा खरी कमाई हा उपक्रम, विविध शैक्षणिक सहली, क्षेत्र भेटी, विविध विषयांवरील व्याख्याने व तज्ञाचे मार्गदर्शन, आरोग्य तापसणी शिबिरे, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी शिबीर, क्रीडा स्पर्धा, विज्ञान विषयक उपक्रम, चित्रकला व गायन या विविध माध्यमातून शाळा विद्यार्थी घडविण्याचा अविरत प्रयत्न करीत आहे.
१०. शारदा विद्यालय पडघे
शिक्षक संख्या- ३४
शिक्षकेत्तर संख्या – ०८
विद्यार्थी संख्या- ११८०
तुकडी संख्या- ३८
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल ७७.७८ %
पडघे या छोट्याशा गावात शिक्षणाची तशी फारशी सुविधा नव्हती. वी उत्तीर्ण झाल्यानंर भिवंडी या गावात शिक्षणासाठी जावे लागत असे. गावाती सुजाण नागरिक एकत्र येवून या समस्येवर काहीतरी तोडगा काढण्याचे ठरविले. या सर्वांनी मिळून १९६० साली एक संस्था स्थापन केली. त्या संस्थे नाव शारदा शिक्षण प्रसारक मंडळ” होय. पुढील काळात शाळेचा हा छोटेखानी रथ सव्यवस्थित चालावा, व पडघा आणि परिसरातील बहसंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून शारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सभासद एकत्र आले आणि छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या आपल्या नामांकित संस्थेच्या स्वाधीन हि शाळा केली. सध्या शाळेत ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असून सेमी इंग्रजीही शिकविले जाते. संस्कृती ज्ञान परीक्षा, रामायण परीक्षा वक्तृत्व परीक्षा, क्रीडा स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन, विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, शालाबाह्य परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा या अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जातो.
११. गंगा गोरजेश्वर विद्यामंदिर फळेगाव
शिक्षक संख्या- ०५
शिक्षकेत्तर संख्या – ०१
विद्यार्थी संख्या- २२६
तुकडी संख्या- ०४
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल- ९८.२०%
१९८४ साली सुरुवातीला नडगाव खडवली येथे स्थानिकांनी शाळा सुरु केली होती. सुरुवातीला शाळा विनाअनुदानित असल्यामुळे परिसरातील गावांना संस्था चालकांना शाळा चालविणे कठीण झाले होते. अनेक अडचणीमुळे शाळा पुढे चालू शकली नाही. तेथील ग्रामस्थ श्री. बाळाराम कडू व श्री. अशोक भोईर यांनी पुढाकार घेवून बंद झालेली हि शाळा छत्रपती शिक्षण मंडळाने १९८४-८५ पासून पुढे चालवावी अशी विनंती केली. सध्या शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा,सूर्यनमस्कार अनुष्ठान, रांगोळी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा विविध शालाबाह्य परीक्षा, वाचन प्रेरणा दिन या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. फळेगाव व परिसरातील विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे. शाळेतील विद्यार्थी उत्तम संस्कारशील व्हावेत शालेय शिक्षणातून जीवनमूल्ये घेवून चांगले नागरिक बनण्याची इच्छा, जिद्द शाळेतील व परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेमुळे मिळाली.
१२. माध्यमिक विद्यालय नांदकर सांगे.
शिक्षक संख्या- ०४
शिक्षकेत्तर संख्या – ०३
विद्यार्थी संख्या- १७०
तुकडी संख्या- ०३
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल – ९५.४० %
कल्याण पासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे गाव पण या गावात शिक्षणाची दुरवस्था होती. या गावातील मुलांचे शिक्षण ७ वी नंतर थांबत असे किंवा भिवंडी या ठिकाणी जावून पूर्ण करावे लागत होते. म्हणून नांदकर गावचे प्रतिष्टीत नागरिक श्री पांडुरंग गोविंद पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी छत्रपती शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून गावात शिक्षणाच्या सोयीसाठी शाळा सुरु कारावी अशी विनंती केली. छत्रपती शिक्षण मंडळाने दिनांक १० जून १९९९ रोजी नांदकर येथे शाळेचा शुभारंभ केला. सुरुवातीला गावकऱ्यांनी मंदिर व व्यायामशाळा उपलब्ध करून दिली. व शाळा सुरु झाली. शाळेच्या मुहूर्तमेढीने परिसरातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा महोत्सव व स्नेहसंमेलन,वृक्षारोपण कार्यक्रम, ग्राम स्वच्छता अभियान, +९ विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा या सारखे उपक्रम राबविले जातात. या छोट्याशा शाळेला ग्रामस्थांनी आपली मानली आहे. परिसरातील गावात शिक्षणाची सोय झाल्यामुळे शाळा व ग्रामस्थ यांचे एक नाते निर्माण झाले आहे.
१३. जनता विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय धसई.
शिक्षक संख्या- १६
शिक्षकेत्तर संख्या – ०५
विद्यार्थी संख्या- ७४७
तुकडी संख्या- १५
धसई हे गाव डोंगर पायथ्याशी वसलेले गाव आहे. सभोवती वाड्या व पाडे असलेले हे गाव. या परिसरात ५० वर्षापूर्वी शिक्षणाची कोणतीच सुविधा नव्हती.मुलींच्या शिक्षणाची तर फारच आबाळ होत होती. वाहतूक व्यवस्था नव्हती. सामाज अतिशय अशिक्षित होता. मुरबाडला एकमेव माध्यमिक शाळा होती. त्यामध्ये प्रवेश मिळवणे आणि त्या शाळेत पोहचणे या दोन्हीही बाबी परिसरातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जवळजवळ अशक्यच होत्या. त्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहत. फार थोडी साधन कुटुंबातील मुले शहरात जावून शिक्षण घेवू शकत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या आमच्या संस्थेने १९६३ साली जनता विद्यालय धसई या शाळेची स्थापना केली. धसई विभागातील ग्रामाभेत जनतेचे हायस्कूल म्हणून ‘जनता विद्यालय’हे नामकरण केले. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली याचे कारण मुरबाड तालुक्याच्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल हे एकच हायस्कूल होते. तालुक्याचा तीन चतुर्थांश भाग शिक्षणापासून वंचित असल्यामुळे उर्वरित भागाची जनता विद्यालय धसई येथे शिक्षणाची सोय झाली. सध्या शाळेत ५ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असून ८१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थांच्या विकासासाठी २००७ मध्ये NIIT या केंद्र शासनाच्या योजनेतून संगणक शिक्षण सुरु कारण्यात आले आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी शाळेने प्लास्टिक मुक्त शाळा करण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थी शाळेत एको ब्रिक्स तयार करीत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास करण्यासाठी शाळेत वक्तृत्व स्पर्धा, योगासने, सूर्यनमस्कार,स्वच्छता अभियान. संविधान दिन, हस्ताक्षर स्पर्धा, विद्यार्थी आरोग्य तपासणी आयोजित केली जाते. सामाजिक बांधिलकी म्हणून वनराई बंधारा व व्यसन मुक्ती व तंबाखू मुक्ती यासारखे उपक्रम राबवले जातात.
१४. सरस्वती विद्यामंदिर सायले
शिक्षक संख्या- ०३
शिक्षकेत्तर संख्या – ०२
विद्यार्थी संख्या- १३४
तुकडी संख्या- ०६
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल १०० % ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असूनही शाळा उपलब्ध होत नव्हती.प्राथमिक शिक्षणाची सोय फक्त गावापुरतीच मर्यादित होती. माध्यमिक शिक्षण शहरामध्ये असल्याने तसेच शहरात जाण्यासाठी दळणवळणाच्या सिविधा नसल्याने सायले गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. अनेक विद्यार्थ्यानी तर प्राथमिक शिक्षणानंतर आपले शिक्षण मध्येच थांबवले होते. अशा परिस्थितीत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या नावारूपाला आलेल्या संस्थेने दिनांक १५/०६/१९७१ रोजी या गावात शाळा काढण्याचे ठरविले. सुरुवातीला लोकवर्गणीतून चालविलेल्या या शाळेत शिक्षक समर्पण भावनेने काम करीत होते. सध्या या शाळेमध्ये शिवराज्यभिषेक दिन, गुरुपोर्णिमा, वक्तृत्व स्पर्धा, शिक्षक दिन, संविधान दिन, मराठी भाषा दिन, चित्रकला स्पर्धा, तसेच पोलि पोलीमर इंडिया प्रा. ली. या कंपनीद्वारे पर्यावरण पूरक प्रयोग, निबंध स्पर्धा, सूर्यनमस्कार, हस्ताक्षर स्पर्धा, शाळाबाह्य परीक्षा या सारखे उपक्रम शाळेत राबविले जातात. मुरबाड तालुक्यातील संस्थेच्या या शाळेने परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गरज पूर्ण केली. छोट्या पाड्या, वस्त्यातील विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण मिळते. पुढील काळात उत्तम नागरिक घडवण्यासाठी शाळेचा मोठा हातभार आहे.
१५. सह्याद्री विद्यालय, नारिवली
शिक्षक संख्या- १३
शिक्षकेत्तर संख्या – ०४
विद्यार्थी संख्या- ३९३
तुकडी संख्या- १०
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल १००%
हुतात्मा भाई कोतवालांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सिद्धगड या परिसरात शैक्षणिक जागृतीचे वारे अभावानेच वाहत होते जवळील २१ किमी अंतरावरील मुरबाड शहरातील एक माध्यमिक शाळा व नुकतेच धसई मधील सुरु झालेली माध्यमिक शाळा येथे जावून शिक्षण घेणे मुलींना व पालकांना परवडणारे नव्हते.गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर जाणे शक्य होत नव्हते. शिक्षणाची आवश्यकता नारिवली गावातील ग्रामस्थांना भासत होती. म्हणून अशा अस्वस्थ कार्यकर्त्यांनी छत्रपती शिक्षण मंडळाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सर्वांसाठी शिक्षण या संस्थेच्या ध्येय धोरणानुसार तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन उघडे करून देणे आवश्यक होते म्हणून सन १९७० साली पांडुरंग पाटील बांगर यांच्या बांगरपाडा येथील घरात शाळेची सुरुवात झाली. विद्यार्थी संख्या वाढती असल्याने वर्गखोल्यांची आवश्यकता लक्षात घेता कंपाउंड व स्वच्छतागृहासह शाळेस पक्की इमारत लाभली आहे. सध्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये पालक संपर्क, शाळाबाह्य परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, पर्यावरणपूरक , कार्यक्रम,विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देवून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल वाढविला जातो.
१७. जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट
शिक्षक संख्या- ०७
शिक्षकेत्तर संख्या – ०३
विद्यार्थी संख्या- २१४
तुकडी संख्या- ०५
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल ९६.७७ %
डेंगाचीमेट हे गाव जयेश्वर, बाळकापरा यांच्या नजीक आहे. जव्हार डहाणू यांच्या हमरस्त्यावर एक साधारण लहान गाव परिसरातील वाड्या वस्तीत प्राथमिक शिक्षणाची सोय होती परंतु माध्यमिक शिक्षणासाठी मात्र जव्हार किंवा अन्यत्र जावे लागत असे. विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नव्हते. सुदैवाने हे गाव शासनाच्या शैक्षणिक प्राधान्य योजनेत घेतले गेले. आणि आपल्या छत्रपती शिक्षण मंडळाने त्वरित शासनाकडे प्रस्ताव सादर करून जून १९९५ मध्ये ८ वी चा वर्ग भाड्याच्या खोलीत सुरु केला. शाळा सुरु करण्यापूर्वी खरा प्रश्न होता विद्यार्थी मिळविण्याचा गावातील ग्रामस्थांनी मेहनत घेवून ती ही समस्या सोडविली. सन १९९८-९९ या शैक्षणिक वर्षात श्री ल. द. जोशी सरांनी श्री सतीशजी पै यांची भेट घेतली त्यांना शाळा दाखविण्यासाठी आणले. चिंचोळ्या जागेत विद्यार्थी बसलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. एक वर्ग शेतामध्ये गवताचा मांडव टाकून तयार केला होता. सन २००१ साली मा श्री सतीशजी पै यांनी शाळा बांधून देण्याची तयारी दाखविली. श्री. नवश्या गांगोडा यांनी शाळेला एक हेक्टर जमीन देवू केली. ०६ फेब्रुवारी रोजी शाळेच्या नाविन वास्तूचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. शाळेच्या पुढाकाराने बाळकापरा ते डेंगाचीमेट विठ्ठल मंदिर अशी वृक्षदिंडी काढली जाते. या दिंडीला ग्रामस्थांना चांगला प्रतिसाद मिळतो. शाळेचे विद्यार्थी विविध क्रीडा क्षेत्रात चमक दाखवीत आहेत. सोन्या दामू राव हा विद्यार्थी राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात दुसरा आला. २००८ साली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेचे तीन विद्यार्थी प्रथम आले. विद्यार्थी शाळेच्या परिसारत आंबा. काजू, व सीताफळ व औषधी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ज्यादा तासिका, आठवडी परीक्षा, दत्तक पालक योजना, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शाळाबाह्य परीक्षा, विविध नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. सद्गुरू दादा नाथ भागवत कला क्रीडा स्पर्धा आयोजित स्पर्धेमध्ये सलग सहा वर्ष फिरती ढाल शाळेने मिळविली आहे.
१८. सद्गुरूनाथ दादा भागवत विद्यानिकेतन सूत्रकार
शिक्षक संख्या- ०८
शिक्षकेत्तर संख्या – ०३
विद्यार्थी संख्या- २६३
तुकडी संख्या- ०६
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल ८८.२३%
सूत्रकार हे मुंबई अहमदाबाद रस्त्यावर पश्चिम दिशेला असलेल गाव. या गावात चौथी पर्यंतची अंधेर गुरुजींची शाळा होती. ४ थी नंतर या गावात शिक्षणाची सौ नव्हती. छत्रपती शिक्षण मंडळाने ही गरज लक्षात घेवून १३ जून १९९६ साली सूत्रकार मध्ये शाळा सुरु केली. महाराष्ट्र विद्यामंदिर या शाळेची सुरुवात अंधेर गुरुजी यांनी आदिवासी सेवा मंडळ या संस्थेमार्फत सुरु केली. पुढे महाराष्ट्र गोपालन समिती मुंबई, हिंदू सेवा संघ त्याप्रमाणे विश्व हिंदू परिषद यांची सहकार्याने शाळा सुरु होती. १०० % आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावामध्ये जे लॉक सरकारी नोकरी मध्ये आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांचीच मुले तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जात. त्यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असत. याचा विचार करून छत्रपती शिक्षण मंडळाने या गावात शाळा सुरु केली. सन १९९६ पासून शाळा सुरु झाली ती तीन वर्ग एकाच खोलीत. सुरती पाद्याचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सूत्रकार यांनी नवीन इमारत बांधण्यास परवानगी दिली. २५ डिसेंबर २००७ रोजी नवीन वास्तूचा भूमिपूजन शुभारंभ शाळेचे आधारास्तभं दानशूर व्यक्तिमत्व मा. श्री. सतीशजी पै यांनी यांच्या शुभ हस्ते झाला. व शाळा दिमाखात सुरु झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन करते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली, विविध नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधला जातो. क्रीडा स्पर्धेत शाळेने नेत्रदीपक कामगिरी नेहमीच केलेली असते. अनेक क्रीडा स्पर्धांमधून शाळेने जिल्हास्तर, राज्य स्तरापर्यंत मजल मारली आहे. आदिवासी बहुल या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना संस्कार व संस्कृतीचे धडे देण्याचे महत्त्वपूर्ण काम शाळा जोमाने करीत आहे.
१९. माध्यमिक विद्यालय, तलासरी
शिक्षक संख्या- १४
शिक्षकेत्तर संख्या – ०३
विद्यार्थी संख्या- ७२०
तुकडी संख्या- ११
विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी प्रकल्पाच्या वसतिगृहातील विद्यार्थी जवळच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ठक्करबाप्पा विद्यालायात शिकत असत. सदर शाळेच्या इयत्ता ८ वी च्या नवीन निर्माण झालेल्या काही तुकड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच वनवासी विकास प्रकल्पातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्याही पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या आपल्या संस्थेने दिनांक १३ जून २००२ मध्ये माध्यमिक विद्यालयाचा प्रारंभ वनवासी विकास प्राकाल्पाच्या जागेतच सुरु केला. शाळेच्या आजूबाजूचा भाग तसा पाड्यांचा व लहान वाड्या वस्त्यांचा. जवळपास संपूर्ण आदिवासी बांधवांचा. आदिवासी बांधवांच्या या मुलांना प्रेमाच्या सावलीत व मायेची उब देवून विकास करणे अत्यंत गरजेचे होते. आणि या सर्व गोष्टी माध्यमिक विद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांनी अतिशय मेहनतीने केल्या. त्यामुळेच आज सर्वच क्षेत्रात आदिवासी बांधवांचा विकास होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, विविध नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध विषयांवरील व्याख्याने, शैक्षणिक सहली, क्षेत्र भेटी, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे विद्यार्थ्यांनीच तयार केलेले हस्तलिखित, यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शाळा विद्यार्थी घडविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. क्रीडा स्पर्धे मध्ये शाळेने परिसरामध्ये आपला ठसा उमटविला आहे. विद्यार्थ्यांची खेळाविषयी असलेली आवड, शिक्षकांची मेहनत यामुळे या शाळेचे विद्यार्थी जिल्हा ते राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. संस्कार व संस्कृती जोपासण्याचे काम याच विद्यार्थ्यांचे माध्यमातून शिक्षक करीत आहेत. शाळेतील उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या गरजा स्थानिक प्रश्न शाळेची उद्दिष्टे लक्षात घेवून राबविले जातात. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा दर्जा, गुणवत्ता वाढ यासाठी ज्यादा तासिका आठवडी परीक्षा, सराव परीक्षा यांचे नियोजन शाळा नेहमीच करते. शाळेचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर सुसंस्कृतपणे कार्यरत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वविकासामध्ये शाळेचा खूप मोठा वाटा आहे.
२०. प्रभा हिरा गांधी विद्यालय मेढा
शिक्षक संख्या – ४
शिक्षकेत्तर संख्या – ०२
विद्यार्थी संख्या – १७०
तुकडी संख्या – ०३
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ निकाल ८३.८७%
मेढा हे गाव जव्हार पासून सुमारे २२ किमी अंतरावर आणि दुर्गम भागात गुजरात राज्य सरहद्दीला लागून आहे. प्रारंभात या परिसरातील सुमारे २९ पाडे व वाड्या मधील विद्यार्थी जव्हारला किंवा चालतवडला आश्रम शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी जात असत. प्राथमिक शिक्षणानंतर अनेकजण आपले शिक्षण अर्धवट सोडून तरी देत अथवा शिक्षणापासून कायम वंचित राहत असत. मेढा येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेता श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ टिटवाळा त. कल्याण जि. ठाणे या संस्थने १३/०६/१९९७ रोजी मेढा येथे वरद विद्यालय मेढा असा इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु केला. सुरुवातीला शिक्षक वर्ग पुरेसा होता. परंतु निसर्गिक तुकडी वाढी नंतर शिक्षक वर्ग अपुरा पडू लागला शिक्षकांना ज्यादा कार्यभार पडत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे हे ग्रामस्थांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी छत्रपती शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून सदर शाळा हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार छत्रपती शिक्षण मंडळ या आपल्या संस्थेने माहे ऑगस्ट १९९९ मध्ये माध्यमिक विद्यालय मेढा हि शाळा सुरु केली. विद्याथी संख्या वाढत होती. शाळा नियमितपणे सुरु होती. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागत होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक ताण पडत होता. काही विद्यार्थ्यांना फी देण्याचीही परिस्थिती नव्हती. मागेल त्याला शिक्षण या उद्देशाने स्थापन झालेल्या आपल्या संस्थने सर्व विद्यार्थ्याची फी भरण्यासाठी मदत केली. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला नाही. मुंबई येथील walk together फौंडेशन च्या सदस्यांनी शाळेला नवीन इमारत २०१६ साली बांधून दिली. या फौंडेशन मधील सदस्यांनी आपल्या आईचे नाव शाळेस देण्याची विनंती केल्यानंर माध्यमिक विद्यालय मेढा या शाळेचे आता प्रभा हिरा गांधी असे नामकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वनराई बंधारा, वृक्ष दिंडी, विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहली, वनभोजन, क्षेत्र भेटी थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमामधून विद्यार्थी घडविण्याचा शाळा सातत्याने प्रयत्न करीत आहे.
Find us
Tilak Chowk, Kalayn(w), Maharashtra 421301
Call us
0251 - 2209396 / 2200921
Mail us
csmandal_kalyan@rediffmail.com